Tue, Jul 23, 2019 10:33होमपेज › Pune › लवासा दयनीय अवस्थेत, कर्जफेडीचा प्रश्‍न गंभीर

लवासा दयनीय अवस्थेत, कर्जफेडीचा प्रश्‍न गंभीर

Published On: Jun 21 2018 1:23AM | Last Updated: Jun 21 2018 12:36AMपुणे : प्रतिनिधी 

खासगी हिलसिटी म्हणून 20 वर्षांपूर्वी हाती घेण्यात आलेला महत्त्वाकांक्षी लवासा प्रकल्प सध्या दयनीय अवस्थेत असून त्याच्या भवितव्याबाबत मोठे प्रश्‍नचिन्ह उभे आहे. हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन लिमिटेडने ही टाऊनशिप उभी करताना जे 41.5 अब्ज रुपयांचे कर्ज घेतले होते त्याची परतफेड करण्यातही अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. 

एकेकाळी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या या परिसराला आता अवकळा आलेली आहे. या परिसरात कचरा वाढलेला असून गुन्हेगारीचे प्रमाणही वाढत आहे. या ठिकाणी निर्माण केलेल्या मनुष्यनिर्मित तलावात पुरेशी देखभाल होत नसल्याने कचरा साठला आहे. तलावाकाठी असलेली कित्येक रेस्टॉरंट्स, कॉफी शॉप्स बंद झाली आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये इथे येणार्‍यांची संख्या कमी झाल्याचे वॉटरफॉल हॉटेलचे सरव्यवस्थापक मुकेश कुमार यांनी सांगितले. याखेरीज ज्या इमारतींचे बांधकाम अपूर्ण होते, त्याही त्याच अवस्थेत असून त्यात प्रगती होण्याची चिन्हे धूसर झाली आहेत.   

सध्या लवासामध्ये 10 हजार नागरीक वास्तव्य करीत आहेत. या प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची पुनर्रचना करावी किंवा थकबाकीदार कंपनीला दिवाळखोरी न्यायालयात खेचावे, असा आग्रह रिझर्व्ह बँकेने धरला आहे. या प्रकल्पात प्रॉपर्टी घेण्यासाठी हजारो लोकांनी आपल्या आयुष्यभराची पुंजी ओतली. काहींनी तर नातेवाईक किंवा मित्रांकडून उसनवारी करुन पैसे उभे केले. तेही अधिक चिंतेत आहेत.

कारण संबंधित घरे बांधली जातील की नाही याबाबत तेे साशंक दिसतात. ‘लवासा’च्या ‘आशियाना’ या ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या प्रकल्पात राहणारे डेव्हिड कूपर (वय 63) म्हणाले, “2012 मध्ये आम्ही राहायला आलो त्यावेळी हा परिसर गजबजलेला आणि उत्साहदायी होता. आता मात्र  इथे स्मशानशांतता आहे. इथे कोणालाही राहण्याची इच्छा नाही.” डेव्हिड कूपर यांच्या पत्नी झेरिंग यांना इथल्या सुरक्षेच्या वातावरणाबाबत अधिक चिंता वाटते. कारण सुरक्षारक्षकांची संख्या कमी झाली असून त्यामुळे घरफोड्यांचे प्रमाणही वाढले आहे. येथील आणखी एक अपार्टमेंट मालक माधव थापर यांनीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या अभावाकडे लक्ष वेधले. शिवाय लवासा सिव्हिक बॉडीचे व्यवस्थापन खासगी पद्धतीने होत असल्याने येथील रहिवाशांना त्याचे कामकाज आणि निधी व्यवस्थापन याबाबत काहीच कळत नाही. 

या प्रकल्पासाठी बँकांनी दिलेले कर्ज बुडीत ठरते की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. ‘लवासा’ने बँकांसह इतर कर्जदारांची देणी वेळेत दिलेली नाहीत. अनेक रोखेधारकांनाही त्यांचे व्याज व इतर रक्कम परत मिळालेली नाही. कंपनीने तीन मे रोजी दाखल केलेल्या निवेदनात त्याचा उल्लेख आहे. अशा स्थितीमध्ये ‘लवासा’च्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न फसल्यास बँकांना याप्रकरणी ऑगस्टच्या सुरुवातीला कंपनीला दिवाळखोरीच्या न्यायालयाकडे नेण्याशिवाय पर्याय उरणार नाही. 

हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले, की आमच्याकडे जी मर्यादित साधनसंपत्ती आहे, त्याच्या आधारे प्रकल्पाचे व्यवस्थापन करत आहोत. या कंपनीने आतापर्यंत मोठमोठे रस्ते, वीजनिर्मिती केंद्रे, 300 हून अधिक पुलांचे बांधकाम आणि इतर अनेक प्रकल्प पूर्ण केले आहेत. लवासा प्रकल्पाला मदत मिळावी म्हणून तीन महत्त्वाच्या गुंतवणूकदारांबरोबर त्यांची बोलणी सुरू आहेत. याची सुरुवात करायची झाल्यास किमान 100 अब्ज रुपये लागणार आहेत. 

सुब्रतो रॉय यांच्या अ‍ॅम्बी व्हॅली प्रकरणातही मध्यंतरी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. 5.5 अब्ज डॉलर्स मूल्याच्या या  टाऊनशिपला लिक्विडेशनला सामोरे जावे लागत आहे. लवासाची ही वाटचाल अ‍ॅम्बी व्हॅलीच्या दिशेने सुरू आहे, अशी शंका काहींना येते. निसस फायनान्स सर्व्हिसेसचे अमित गोयंका म्हणाले की, लवासासारखी मोठी लँड बँक विकण्यासाठी गुंतवणूकदार शोधणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. बाजारपेठेमध्ये पुरेसे गुंतवणूकदार नाहीत.