Mon, Apr 22, 2019 12:04होमपेज › Pune › ‘आयपीएफ’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ

‘आयपीएफ’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:35PMपुणे : प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांत इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिस (आयपीएफ) या गंभीर स्वरूपाच्या आणि प्राणघातक असणार्‍या आजाराच्या रुग्णांमध्ये 30-40% इतकी मोठया प्रमाणात वाढ झाली आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक आढळत असून धुम्रपान आणि पर्यावरणातील प्रदूषित घटक यास कारणीभूत आहेत अशी माहिती रुबी हॉल क्‍लिनिकचे फुफ्फुसविकारतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते आयपीएफचे रुग्ण आणि लक्षणे यासंदर्भात बोलत होते.

2011 च्या लोकसंख्येच्या गणनेनुसार भारतातील तब्बल 7.2 कोटी व्यक्तींना याची लागण झाली आहे.  या विकाराची लक्षणे व्यक्तिगणिक बदलतात. असे असले तरी सुरुवातीला, कष्टाचे काम केल्यावर धाप लागणे, आठ आठवडयांपेक्षा अधिक काळ असणारा कोरडा खोकला ही आयपीएफची लक्षणे आहेत. या लक्षणांवरून हा आजार हृदयविकार, ब्रॉन्कायटिस, दमा, क्षयरोग आहे का असा  गैरसमज होऊ शकतो.  त्यामुळे केवळ लक्षणांनुसार या आजाराचे निदान होउ शकत नाही. पण जेव्हा इतर डॉक्टर यापैकी कोणताच आजार निदान होत नाही. यामध्ये तातडीने छातीविकारतज्ज्ञाचे मत घ्यावे. केवळ छातीचे (फुप्फुसाचे) सीटी स्कॅन करून या आजाराचे निदान होते. केवळ एक्स रे मुळे देखील त्याचे निदान होत नाही असे डॉ. मोदी यांनी सांगितले. 

हा आजार मध्यमवयीन आणि वयस्कर व्यक्तींमध्ये अधिक आढळतो. 40-70 वयोगटातील व्यक्तींना या आजाराची लागण अधिक होते. या आजारामागील कारण अजूनही अज्ञात आहे. 

अनुवांशिकता आणि मधुमेह आयपीएफ विकसित होण्यासाठी कारणीभूत असावेत अशा शक्यता वर्तविण्यात येत आहे. आयपीएफचे निदान लवकर झाल्यास तो बरा होण्यासाठी  तीन ते चार वर्षाचा कालावधी जातो. त्यासाठी स्वतंत्र औषधे आहेत.

काय आहे ‘आयपीएफ’ आजार  

इडियोपॅथिक पल्मोनरी फायब्रॉसिस  (आयपीएफ) हा फुफ्फुसविकार आहे. या आजारात फुफ्फुसांना ओरखडे (फायब्रॉसिस) येतात. कालांतराने ते जाड आणि कडक होतात. त्यामुळे रुग्णाला श्वासोच्छवास करण्यास कठीण जाते. जसजसा आजार बळावत जातो, तसतसं त्या व्यक्तीला दैनंदिन क्रिया करणे कठीण होऊन बसते आणि  शरीरात ऑक्सिजनची कमतरता होऊन कोणतेही काम करणे त्रासाचे होते.

कसा ओळखावा हा आजार

जलद आणि उथळ श्वासोच्छवास  
थकवा आणि गळून जाणे 
दीर्घकाळ असलेला कफ
छातीत दुखणे आणि घट्टपणा जाणवणे 
विनाकारण वजन घटणे  
भूक मंदावणे, बोटांचा आकार बदलणे, स्नायू आणि सांधे दुखणे