Mon, Jul 15, 2019 23:42होमपेज › Pune › भ्रष्टाचार विरोधात लढतोय ‘लंगोटी’यार

भ्रष्टाचार विरोधात लढतोय ‘लंगोटी’यार

Published On: Aug 08 2018 1:50AM | Last Updated: Aug 08 2018 12:57AMपुणे : प्रतिनिधी

लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा वापर करून आंदोलनाच्या नवनवीन क्‍लुप्ती अंमलात आणल्या जातात. परंतु, दौंड नगरपालिका आणि खासगी शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार करणार्‍यांविरोधात 10 ते 12 वेळेस आंदोलन, उपोषण करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दौंड येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक माने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून लंगोटीवर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

माने यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दौंड येथील भीमथडी शिक्षण संस्थेने 10 हजार चौरस क्षेत्रावर विनापरवाना बांधकाम करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविला आहे. त्यामुळे संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. दौंड नगरपालिकेने एका मोबाईल कंपनीला इतर कंपन्यांच्या तुलनेत खोदकाम करण्याची कमी दराने परवानगी दिली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे, असे असताना दोषींवर कोणतीच कारवाई केली जात नाही. तसेच रहिवासी वापराच्या भूखंडावर वाणिज्य बांधकाम करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविण्यात आला असून, त्यावर नगरपालिकेचे मुख्याधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप निवेदनात माने यांनी केला आहे.

भीमथडी शिक्षण संस्थेला ज्या उद्देशासाठी भूखंड दिला आहे, त्यासाठी न वापरता व्यापारी गाळे बांधून शर्तभंग केला आहे. शिक्षण संस्थेने भूमिअभिलेख विभागाच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून मिळकत प्रमाणपत्रावर खाडाखोड केल्याचा आरोप केला आहे. तसेच यातील भ्रष्टाचारप्रकरणी पुणे विभागीय कार्यालयाने कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिला आहे. मात्र स्थानिक प्रशासन भ्रष्टाचार करणार्‍यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप माने यांनी निवेदनात केला आहे.

माने यांच्या आरोपासंदर्भात दौंड नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले की, मोबाईल कंपनीच्या खोदाईबद्दल कारवाईचे पत्र पोलिसांना दिले आहे. माने यांनी उपस्थित केलेल्या इतर प्रकरणांबाबत वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल. भीमथडी शिक्षण संस्थेचे सचिव प्रेमसुख कटारिया यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. 

नगरपालिका आणि भीमथडी शिक्षण संस्थेत भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले असून,त्यांच्यावर कारवाई करण्यास नगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालय टाळत आहे. संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, यासाठी 10 ते 12 वेळा आंदोलन, उपोषण केले आहे. त्यावेळी आश्‍वासन मिळाले. मात्र, कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लंगोटीवर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

- विनायक माने, उपोषणकर्ते