Sat, Feb 23, 2019 06:04होमपेज › Pune › चिंचवडमधील नदीलगतच्या रस्त्याचे भूसंपादन

चिंचवडमधील नदीलगतच्या रस्त्याचे भूसंपादन

Published On: Sep 10 2018 1:17AM | Last Updated: Sep 10 2018 12:46AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे जुन्या हद्दीच्या मंजूर विकास योजनेतील (डीपी) चिंचवड येथील सर्व्हे क्रमांक 51 पासून पवना नदीलगतच्या सर्व्हे क्रमांक 47 व 48 पर्यंतच्या 45 मीटर रस्ताचे भूसंपादन करण्यात येणार आहे. या रस्त्यामुळे डांगे चौक ते निगडीपर्यंत  वाहतूकसुलभ होणार आहे. या रस्त्यासाठी भूसंपादनाचा व नुकसान भरपाईच्या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या स्थायी समिती सभेपुढे आहे.

सदर रस्त्यासाठी भूसंपादन करण्यास पालिकेच्या सर्वसाधारण सभेने 20 एप्रिलला मंजुरी दिली आहे. हा रस्ता डांगे चौक ते निगडी गावाला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. त्यामुळे हिंजवडी आयटी पार्क ते तळवडे आयटी पार्क या ठिकाणी होणारी वाहुक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. या 45 मीटर रस्त्यासाठी पालिकेने जागा ताब्यात घ्यावी. त्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी, असे पत्र भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिकेस दिले आहे. 

मात्र, सदर ठिकाणच्या रस्ताबाधित मिळकतींचा ताबा पालिकेस आवश्यक असेल तर, मिळकतींची मोजणी पालिकेने स्वत: करावी, अशी बाधितांची मागणी आहे. सदर भागाचा आलेख पालिकेकडे उपलब्ध नसल्याने रस्त्याची आखणी बसविणे, जागावर सीमांकन करणे, विकास योजना अभिप्राय देणे या पालिकेच्या संबंधित विभागास अशक्य आहे. नगर भूमापन कार्यालयाकडून आलेख उपलब्ध झाल्यास बाधित मिळकतींच्या भूमापनाचे काम सोयीचे होणार आहे. त्यानुसार बाधित मिळकतधारकांना पालिका भूसंपादनाऐवजी ‘टीडीआर’ किंवा खासगी वाटाघाटीचे बदल्यासदेखील बाधित क्षेत्राचा आगाऊ ताबा देण्यास तयार होतील, असे पालिका प्रशासनाचा दावा आहे. 

सदर रस्त्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यासाठी  व प्रस्तुत जमिनीचे भूमीसंपादन व पुनर्वसन करताना वाजवी नुकसानभरपाईच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता आवश्यक आहे. तसेच, त्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण, मोजणी करणे आदी कामांना मान्यता देण्याचा प्रस्ताव मंगळवारी (दि. 11) होणार्‍या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे.