होमपेज › Pune › जमिनीच्या वादातून शहांचा खून?

जमिनीच्या वादातून शहांचा खून?

Published On: Jan 25 2018 1:18AM | Last Updated: Jan 25 2018 12:53AMपुणे :  प्रतिनिधी

बांधकाम  व्यावसायिक देवेन शहा यांचा खून जमिनीच्या वादातून झाल्याचा दाट संशय पोलिस यंत्रणेकडून व्यक्त केला जात असून या गुन्ह्यामागचा मुख्य सूत्रधार कोण? याचा पोलिस कसून तपास करत आहेत. मंगळवारी पकडलेला मुख्य संशयित  राहुल चंद्रकांत शिवतारे (45, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक) याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे पाटील यांनी 29 जानेवारीपर्यंत पोलिस  कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. 

दरम्यान त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पनवेल येथील रेल्वे स्थानकांतून पोलिसांनी बुधवारी जप्त केली आहे. पनवेल येथे दुचाकीवर गेल्यानंतर दोघांनी रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगमध्ये दुचाकी लावली होती. त्याची रितसर पावतीही घेतल्याचे समोर आले आहे.  

प्रभात रस्त्यावर झालेल्या देवेन शहा खून प्रकरणी सर्वप्रथम शिवतारेचा साथीदार रविंद्र सदाशिव चोरगे याला जळगाव येथून अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत गुन्ह्यासाठी वापरलेली पिस्तुले सुरेंद्र शामकरे पाल याच्याकडे ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या मिळालेल्या माहितीवरुन पाल यालाही मंगळवारी अटक करण्यात आली होती. यानंतर रात्री सिंहगड पोलिस ठाण्यातील कर्मचार्‍यांना मिळालेल्या माहितीवरून शिवतारे याला राजाराम पुलाजवळ सापळा रचून अटक करण्यात आली.

शहा यांच्या खुनानंतर डेक्कन पोलिसांनी सहा पथके तसेच गुन्हे शाखेचे पथकही आरोपींच्या मागावर होते. खून केल्यानंतर दोघेही भोर, महाड, खोपोली, अक्कलकोट, ठाणे, मध्यप्रदेश आदी ठिकाणी गेले होते. पैसे संपत आल्यावर दोघेही वेगळे झाले. यातील चोरगे जळगाव येथील लॉजवर 21 जानेवारी रोजी सापडला. तर या दोघांनी गुन्ह्यात वापरलेली हत्यारे सुरेंद्र पाल याच्याकडे ठेवली होती. त्यालाही मंगळवारी ठाण्यातून अटक करण्यात आली.

शिवतारेला सिंहगड पोलिसांनी मंगळवारी रात्री राजाराम पुलाजवळून अटक केली.खुना मागचा मास्टर माईंड कोण आहे याबाबत कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.  शिवतारे याला  कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिल मोरे यांनी केली केली.  शिवतारे याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता अ‍ॅड. मोरे यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मंजूर केली.