होमपेज › Pune › भूसंपादनास तेराशे कोटी भरा

भूसंपादनास तेराशे कोटी भरा

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 11 2018 12:59AMपुणे : प्रतिनिधी

महापालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे भूसंपादनासाठी 18 प्रस्ताव सादर केले आहेत. भूसंपादनासाठी तेराशे कोटी रुपये त्वरीत भरावेत, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी महापालिकेला दिल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱी कार्यालयाकडे भरण्यासाठी पालिकेकडे निधीच उपलब्ध नसल्याने नवीन भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. 

शहराच्या विकासाच्या दृष्टीने आरक्षित जागा, रस्ते, विविध आरक्षणे ताब्यात येणे महत्वाचे आहे. नविन कायद्याप्रमाणे भूसंपादन करणे अवघड झाले आहे. मोबदल्याची रक्कम नवीन कायद्याप्रमाणे वाढत आहे. वेळेत भूसंपादन न झाल्यास कोट्यवधी रुपयांनी खर्च वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. टीडीआर किंवा एफएसआयच्या बदल्यात जागा देण्यास जागामालक तयार होत नाहीत. अनेकांना रोख मोबदला हवा असल्यामुळे जागा मिळण्यास अडचणी येत आहेत.

महापालिकेने जिल्हाधिकार्‍यांकडे भूसंपादनासाठी दिलेल्या 18 प्रस्तावामध्ये रस्ते, आरक्षणाच्या जागा यांच्या समावेश आहे. जिल्हाधिकार्‍यांकडुन निवडा जाहिर करण्यात आला आहे. यामध्ये येरवडा, लोहगाव व वडगावशेरी  रस्त्याच्या रुंदीकरण मोबदल्यापोटी 481 कोटी रुपये मोबदला द्यायचा आहे.

नाना पेठ रस्ता रुंदी 13 कोटी, खराडी रस्तारुंदी 33 कोटी, वारजे रस्तारुंदी 61 कोटी, बाणेर रस्ता रुंदी 15 कोटी, भवानी पेठ गार्ड, 15 कोटी, बाणेर पार्किंग 2 कोटी अशी विविध प्रकरणे मिळून तेराशे कोटी रुपये जिल्हाधिकार्‍यांकडे भरणे आवश्यक आहे. तरच या प्रकल्पाची भूसंपादन पुर्ण होणार आहे. दुसरीकडे यावर्षी भूसंपादन विभागाला केवळ 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

भूसंपादनासाठी लागणार हजारो कोटी : 

महापालिका प्रशासनाकडुन अनेक महत्वाचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यामध्ये एचसीएमटीआर प्रकल्पासाठी  सुमारे आकराशे कोटी रुपये लागणार आहेत. त्याचबरोबर कात्रज कोंढवा रस्त्यासाठी 710 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. जून्या हद्दीचा विकास आराखडा मान्य झाला असल्यामुळे यासाठी निधीची आवश्यकता आहे. भूसंपादन विभागाकडे 238 प्रस्ताव भूसंपादनाचे असून यासाठी हजारो कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

 

Tags : pune, pune news, Pune Municipal Corporation, Land acquisition,