Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Pune › जागामालकांचा जागा देण्यास नकार

भूसंपादनाचा तिढा सुटता सुटेना

Published On: Jun 01 2018 2:12AM | Last Updated: Jun 01 2018 12:12AMपुणे ः प्रतिनिधी

चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे काम भूसंपादनामुळे रखडल्याने केंद्रीय रस्ते, वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी 100 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची तयारी दशिवल्यानंतरही भुसंपादनाचा तिढा सुटण्याचे नाव घेत नाही. उड्डाणपूलाच्या कामासाठी आणि काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्ता करण्यासाठी आवश्यक 15 हेक्टर जागेपैकी फक्त 6 हेक्टर जागेचाच प्रश्‍न मार्गी लागलेला असून, उर्वरीत जागा देण्यास जागा मालक नकार देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. 

मुंबई आणि कोकणात जाणार्‍या सर्वाधिक वहानचालकांकडून शहराच्या पश्‍चिमेस असलेल्या चांदणी चौकाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. परिणामी या चौकात आणि परिसरात मोठी वाहतुक कोंडी होते. ही वाहतुकोंडी सोडविण्यासाठी या चौकात उड्डाणपूल साकारला जाणार आहे. उड्डाणपुलाच्या कामाचे भूमीपूजन 27 ऑगस्ट 2017 रोजी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. पुलाचे काम सहा महिन्यांत सुरू केले जाईल, असे आश्‍वासन त्यावेळी गडकरी यांनी दिले होते. या घटनेस दहा महिन्यांचा कालावधी उलटत आला तरीही अद्याप उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले नाही. 

हा उड्डाणपुल राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधीकरणामार्फत केला जाणार आहे, मात्र या उड्डापुलाचे काम सुरु झाल्यानंतर या कामासाठी आणि पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी अडथळा ठरणार्‍या जागा ताब्यात घेण्याचे काम महापालिकेकडून केले जाणार आहे. यासाठी सुमारे 15 हेक्टर जागेची आवश्यकता आहे. याशिवाय 88 फ्लॅट, 2 इमारती व 1 बंगला बाधित होणार आहेत. या बाधितांना मोबदला देण्यासाठी स्थायी समितीने वर्गीकरणाद्वारे रक्कम उपलब्ध करून दिल्याने येथील तिढा सुटला आहे. 

मात्र आवश्यक असणार्‍या 15 हेक्टर जागेपैकी 6 एकर जागेचा ताब्यात आली असून उर्वरीत 9 हेक्टर जागेचा प्रश्‍न अद्याप मार्गा लागला नाही. या 9 हेक्टर जागेचे 10 जागामालक असून त्यापैकी फक्त दोन जागामालकांसोबतच जागा ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु आहे. उर्वरीत 8 जागामालक काही केल्या जागा देण्यास तयार नाहीत. ही जागा कायदेशीर मार्गाने ताब्यात घ्यायची म्हंटल्यास त्याला तीन ते चार वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनासमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. जागा देण्यास नकार देणार्‍यांमध्ये काही भाजप पदाधिकार्‍यांचाही समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 

पालिकेने भुसंपादन केले नसल्याने पुलाचे काम रखडले आहे. उड्डाणपुलाच्या कामाचा आराखडा, ठेकेदार आणि पैसे तयार आहेत. भूसंपादनासाठी पैशाची अडचण येत असेल तर पालिकेने शहरातील एखाद्या उड्डाण पुलाचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा, त्याला आम्ही 100 कोटी रुपये देऊ, ते पैसे तुम्ही भुसंपादनासाठी वापरा, असा सल्ला तीन आठवड्यापूर्वी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पालिकेला दिला. मात्र अद्याप हा तिढा सुटलेला नाही, तो दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे समोर येत आहे.