Wed, Jan 23, 2019 11:22होमपेज › Pune › पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे दागिने लंपास

पॉलिशच्या बहाण्याने सात तोळे दागिने लंपास

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 08 2017 12:34AM

बुकमार्क करा

पुणे : प्रतिनिधी

पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी हातचलाखीने एका महिलेचे सात तोळ्यांचे दागिने लंपास केले. ही घटना कर्वेनगरमधील मातोश्री कॉलनीत बुधवारी (दि. 6 ) दुपारी पावणेदोन वाजता घडली़
सुनीता टेके (वय 50, रा़ मातोश्री कॉलनी, कर्वेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी सुनीता टेके या बुधवारी दुपारी घरी असताना त्यांच्या घरी दोन व्यक्ती आल्या. दोघांनी काही मिनिटात तुमचे सोन्याचे दागिने चमकवून दाखवतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या बोलण्याला भुलून फिर्यादींनी त्यांच्याकडील सात तोळे वजनाचे सोन्याचे गंठण आणि पाटल्या दोघांकडे दिल्या़  त्यानंतर दागिने एका डब्यात टाकून पाणी आणि हळद टाकली आणि  काही वेळानंतर पाणी गरम करायला गॅसवर ठेवा असे सांगितले़  मात्र हे करत असताना त्यांनी फिर्यादी महिलेची नजर चुकवून डब्यातील दागिने काढून घेतले आणि दोघेही तेथून निघून गेले़  डबा उघडून पाहिला तेव्हा त्यात सोन्याचे दागिने नव्हते. त्यानंतर त्यांनी   फिर्याद दिली. तपास उपनिरीक्षक एम.जी.त्र्यंबके करीत आहेत.