Thu, May 23, 2019 15:06
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › ‘बीआरटीएस’च्या जाहिरातींसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी

‘बीआरटीएस’च्या जाहिरातींसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 12:57AM

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी-निगडी आणि काळेवाडी फाटा ते आळंदी-देहूगाव रस्ता येथे ‘बीआरटीएस’ मार्ग विकसित केला जाणार आहे. या पीएमपी बससेवेची नागरिकांना माहिती व्हावी म्हणून महापालिका 55 लाख रुपये खर्च करणार आहे. त्यासाठी सेंट्रल एन्व्हार्मेंट एज्युकेशन (सीईई) या संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने ‘जेएनएनयूआरएम’ योजनेअंतर्गत शहरातील चार मार्गांवर ‘बीआरटीएस’ सेवा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी औंध-रावेत रस्ता, नाशिक फाटा चौक ते वाकड या रस्त्यावरील ‘बीआरटीएस’ सेवा 2015ला सुरू करण्यात आली आहे. या ‘बीआरटीएस’तील पीएमपी सेवेबाबत नागरिकांना संपूर्ण माहिती व्हावी, याकरिता जाहिरातींसाठी त्या वेळी जागतिक बँकेच्या (जीईएफ) अर्थसाह्याने सल्लागार नेमणूक केली होती. 

महापालिकेमार्फत दापोडी-निगडी आणि काळेवाडी फाटा-आळंदी-देहूगाव रस्ता या मार्गावर ‘बीआरटीएस’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. याही सेवेची नागरिकांना माहिती व्हावी, म्हणून जाहिरात करावी, असे जागतिक बँकेकडून सुचविण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाच्या शहरी निर्माण विभागामार्फत जागतिक बँकेला सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला जागतिक बँकेने 31 ऑक्टोबर 2017ला मान्यता दिली आहे. 

जागतिक बँकेच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार या कामाचा अनुभव असलेली पर्यावरण शिक्षण केंद्र ही संस्था आहे. त्यामुळे या संस्थेमार्फत काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 54 लाख 75 हजार रुपये खर्च येणार आहे. त्यात सेवाकराचा खर्च अतिरिक्त आहे. हा खर्च जागतिक बँकेच्या मंजूर निधीतून करण्यात येणार आहे. त्यात जागतिक बँकेचा हिस्सा 89 टक्के अणि महापालिकेचा हिस्सा 11 टक्क्यांप्रमाणे खर्च केला जाणार आहे. या प्रस्तावाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.