Sun, Mar 24, 2019 17:33होमपेज › Pune › बँकेतून लाखाची रोकड पळवली

बँकेतून लाखाची रोकड पळवली

Published On: Jul 01 2018 2:15AM | Last Updated: Jul 01 2018 1:41AMपुणे : प्रतिनिधी

डॉक्टर महिलेकडील 97 हजार 500 रुपये भामट्याने बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगत घेतले. तुमचे पैसे मॅनेजरकडे देतो, असे म्हणत ही रोकड घेऊन भामटा पसार झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी कात्रज परिसरातील एसबीआय बँकेत घडली आहे.  याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी डॉ. अंकिता अभिजित शिरकाडे (31, रा. आंबेगाव पठार) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी डॉक्टर असून, त्यांचे आंबेगाव पठार भागात रुग्णालयात आहे. दरम्यान त्या शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कात्रज परिसरातील एसबीआय बँकेच्या शाखेत पैसे भरण्यासाठी आल्या होत्या. त्या शाखेत आल्या असताच तेथे एकजण त्यांना भेटला. त्याने त्यांना पैसे भरण्याची स्लीप आणून दिली. त्यानंतर त्यांना बँकेची वेळ संपत येणार असल्याचे सांगितले.  बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून त्यांना मॅनेजरकडे नेहून देतो, असे म्हणत त्यांच्याकडून 97 हजार 500 रुपयांची रोकड व पैसे भरल्याची स्लीप घेतली. त्यानंतर तो त्यादिशेने गेला. परंतु, काही क्षणातच तेथून पसार झाला असल्याचे फिर्यादींंच्या लक्षात आले. त्यांना फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, पोलिसांकडून परिसरातील तसेच बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये शहरात एटीएम मशिन तसेच बँकेच्या बाहेर लूटमार आणि फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यानुसार, शहरात अशी टोळी सक्रिय झाल्याची शक्यता व्यक्त पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.