होमपेज › Pune › विकासकामांवर कमी; सल्लागारांवरच उधळपट्टी

विकासकामांवर कमी; सल्लागारांवरच उधळपट्टी

Published On: Apr 10 2018 1:40AM | Last Updated: Apr 10 2018 1:28AMपुणे : पांडुरंग सांडभोर

मोठा गाजावाजा करून राबविण्यात येत असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचा कसा बोजवारा उडाला आहे, हे आता समोर आले आहे. या योजनेअंतर्गत पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीला 395 कोटींचा निधी मिळाला आहे. मात्र, गेल्या दोन वषार्र्ंत यामधील फक्त 43 कोटींचा खर्च झाला आहे. धक्‍कादायक बाब म्हणजे यातील 20 कोटी विकासकामांवर, तर 23 कोटींची उधळपट्टी ही सल्लागार आणि कार्यालयीन कामावर झाली आहे.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटी ही महत्त्वाकांक्षी योजना आणली. त्याअंतर्गत देशातील शंभर शहरे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. स्पर्धात्मक पध्दतीने या शहरांची निवड करण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 10 शहरांमध्ये पुणे शहराने देशात दुसरा क्रमांक मिळवून, या योजनेत स्थान पटकावले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 25 जून 2016 ला पुण्यात येऊन या योजनेतील विकासकामांचा शुभारंभ केला. मात्र, आता जवळपास दोन वर्षे होत असताना ही योजनाच कशी फुसका बार ठरत आहे, हे चव्हाट्यावर येऊ लागले आहे. 

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पुणे स्मार्ट सिटी कंपनीला केंद्र, राज्य आणि महापालिका यांच्याकडून दोन वषार्र्ंत तब्बल  395 कोटींचा निधी मिळाला. मात्र, आज अखेरपर्यंत त्यामधील केवळ 20 कोटींचा निधीच विकासकामांवर खर्च झाला आहे, तोही प्रामुख्याने औंध-बाणेर-बालेवाडी या भागात रस्ते रि-डिझाईन (पुनर्रचना), स्मार्ट एलिमेंट, इंटेलेजिन्ट रोड मॅनेजमेंट सिस्टिम आणि स्टार्टअप अशा काही योजनांवर हा खर्च झाला आहे.

यातील धक्‍कादायक बाब म्हणजे विकासकामांपेक्षा अधिक निधी हा सल्लागारांची फी आणि कार्यालयीन खर्चावर झाला. त्यासाठी तब्बल 23 कोटी खर्च झाले आहेत. यामधील जवळपास 15 ते 16 कोटी या योजनेसाठी नेमलेल्या सल्लागाराला देण्यात आले आहेत, तर उर्वरित खर्च कार्यालयीन खर्च असून, त्यात प्रामुख्याने कर्मचार्‍यांचा पगार व अन्य गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे या योजनेतून नक्‍की कोणाचे हित साधले जात आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीकडून निधी खर्च होऊ न शकल्याने केंद्राने पुढच्या टप्प्यातील निधी देण्यास नकार दिला असल्याचेही दै. ‘पुढारी’ने उजेडात आणले होते.

240 कोटींची कामे सुरू

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत प्रामुख्याने 160 कोटींचे स्मार्ट एलिमेंट्स आणि 300 कोटींचा आयटीएमएस असे दोन मोठे प्रकल्प राबविण्याचे नियोजन होते, मात्र, आयटीएमएस प्रकल्पाला संचालक मंडळांची मंजुरी अद्याप मिळू शकलेली नाही. त्याचबरोबर एल अ‍ॅन्ड टी कंपनीकडून जी कामे सुरू आहेत, त्यामधील अनेक कामे साठ ते सत्तर टक्के पुर्ण झाली आहेत. मात्र, शंभर टक्के कामे पूर्ण झाल्याशिवाय निधी देऊ नये, अशी अट आहे; त्यामुळे हा निधी मिळालेला नाही. प्रत्यक्षात आत्तापर्यंत 240 कोटी रुपयांच्या विकासकामांचे आदेश देण्यात आले आहेत. - राजेंद्र जगताप,  सीईओ, स्मार्ट सिटी कंपनी

 

Tags : pune, pune news, Pune Smart City Development Company, development,