Tue, Apr 23, 2019 20:26होमपेज › Pune › स्मार्ट सिटी उजळणार एलईडी दिव्यांनी

स्मार्ट सिटी उजळणार एलईडी दिव्यांनी

Published On: Aug 10 2018 1:24AM | Last Updated: Aug 10 2018 1:23AMपिंपरी : प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी पथदिवे ‘एलईडी’ने उजळणार आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वीजबचतीमध्ये दरवर्षी 30 ते 50 कोटींची बचत होणार आहे. ‘इस्को’ तत्त्वानुसार राबविण्यात येणार्‍या या कामासाठी सुरुवातीला पालिकेस कोणताही खर्च करावा लागणार नाही.

महापालिकेतर्फे एलईडी दिवे लावण्यास गेल्या 5 वर्षांपूर्वी सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 10.06 एमडब्ल्यूचे एकूण 38 हजार 755 एलईडी पथदिवे बसविर्‍यात आले आहेत. अद्याप शहरात 36 हजार 134 दिवे हे सोडियम व्हेपर, टी-फाईव्ह, सीएलएफ, मेटल हालाईट या प्रकाराचे आहेत. त्या ठिकाणी एलईडी दिवे बसविण्याचे काम पालिका स्वखर्चातून किंवा ‘इस्को’ माध्यमातून करणार होती.  

मात्र, राज्यशासनाने 12 जानेवारीच्या अध्यादेशानुसार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी पथदिव्यांसाठी केवळ एलईडी दिवे बसविणे आणि त्यासाठी ईईएसएलसोबत करारनामा करणे बंधनकारक केले आहे.  त्यानुसार पालिकेने ईईएसएलकडून माहिती व प्रकल्प प्रस्ताव मागविला. अद्याप शहरात 36 हजार 134 एलईडी दिवे बसविण्याची गरज आहे. 
सर्व दिवे चालू स्थितीत गृहीत धरून दिवाबत्तीचे वार्षिक वीजबिल 27 कोटी 39 हजार इतके आहे. जुने दिवे काढून एलईडी फिटिंग बसविण्यात येणार आहेत. त्याची 7 वर्षांची वॉरंटी आहे. मध्यवर्ती नियंत्रित कक्षातून दिवे नियंत्रित करणारी यंत्रणा असणार आहे. देखभाल व दुरुस्ती ईईएसएल करणार असून, पायाभूत सुविधा पालिकेस द्यावे लागणार आहेत. एलईडी दिवे लावल्यानंतर होणार्‍या बिल व खर्चाच्या बचतीची अँन्युटी बेसीसवर रक्‍कम पालिकेला 7 वर्षे  ईईएसएलला द्यावी लागणार आहे. ईईएसएलसोबत करारास मान्यतेचा विषय मंगळवारी (दि.14) होणार्‍या शहर सुधारणा समिती सभेपुढे आहे.  

रस्त्यानुसार दिव्यांचा प्रकाश होणार नियंत्रित

या कामासाठी सुरूवातीला पालिकेस कोणताही खर्च करावा लागणार नाही. सर्व एलईडी दिवे ईईएसएल लावणार आहे. सध्याच्या व एलईडी दिवे बसविल्यानंतर दिव्यांच्या प्रकाश तीव्रतेचा पाहणी अहवाल तयार करण्यात येणार आहे. नॅशनल लाईटींग कोडनुसार रस्त्यावर आहे तशीच किंवा त्यापेक्षा जास्त सुधारित लक्स लेवल ठेऊन दिव्यांचे वॅटेज निश्‍चित केले जाणार आहे.