Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Pune › कुंडमळा पर्यटनस्थळ बनले धोकादायक 

कुंडमळा पर्यटनस्थळ बनले धोकादायक 

Published On: Jul 11 2018 1:38AM | Last Updated: Jul 10 2018 11:48PMइंदोरी : ऋषिकेश लोंढे

पावसाळा सुरू होताच पुणे तसेच मुंबई परिसरातील पर्यटकांची पावले मावळातील पर्यटनस्थळांकडे वळतात. मित्रांसमवेत  वर्षाविहाराचा आनंद  लुटण्यासाठी मावळ परिसरात पर्यटकांचा  ओघ दिवसेंदिवस वाढतो आहे; मात्र काही हुल्लडबाज पर्यटक नको ते जीवघेणे धाडस करत आपला तसेच इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अशाच काही दुर्घटनांमुळे इंदोरीतील कुंडमळा पर्यटनस्थळ धोकादायक बनले आहे. येथील रांजण खळग्यांमध्ये हुल्लडबाजी तसेच सेल्फीच्या नादात अनेक पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

मावळातील लोणावळा, पवना धरण तसेच सध्या चर्चेत असलेले इंदोरी मावळ येथील कुंडमळा पर्यटनस्थळ हौशी पर्यटकांना खुणावत आहे. बेगडेवाडी (तळेगाव दाभाडे) रेल्वे स्थानकापासून दोन कि.मी अंतरावर असलेले हे ठिकाण वर्षाविहारासाठी पर्यटकांचे आवडते ठिकाण बनले आहे. रांजण खळग्यांतून नागमोडी वळणे घेत वेगाने धावणारे फेसाळलेले इंद्रायणीचे पाणी पाहण्याचा आनंद आता हुल्लडबाजी करणार्‍या पर्यटकांच्या जीवावर बेततोय. घोरावडेश्वर टेकडी आणि कुंडमळा या ठिकाणांवर पर्यटक गर्दी करु लागले आहेत.

जीवघेणे धोकादायक ’स्टंट’ या ठिकाणी पर्यटक करतात व स्वतः चा जीव गमवातात.  आतापर्यंत या ठिकाणी शहरी भागातील शाळा, कॉलेजमधील  अनेक विद्यार्थ्यानी हुल्लडबाजी करताना रांजण खळग्यांमध्ये पडून जीव गमवला आहे.येथे कुंडदेवीचे पौराणिक मंदिर आहे. येथील रांजण खळग्यांमुळे इंद्रायणी नदीच्या प्रवाहाची गती जास्त होते. त्यामुळे फेसाळत्या पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही. रांजण खळग्यांमध्ये पडल्यावर कुशल पोहणाराचेही पाण्याच्या वेगापुढे काही चालत नाही. प्रसंगी पर्यटकांना आपला जीव गमवावा लागतो.  

स्थानिकांनी येथील धोकादायक ठिकाणांविषयी माहितीफलक लावूनही काही हुल्लडबाज पर्यटक ते फाडून टाकतात. सोशल मिडीयावर झळकण्यासाठी सेल्फ़ी काढताना पाय घसरून पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन जीव गमावल्याचाही काही दुर्घटना येथे घडल्या आहेत. महाविद्यालयीन तरुण येथे शक्ती प्रदर्शन करताना दिसुन येतात. वाहत्या पाण्यामध्ये उंच दगड़ांवर जाऊन या ठिकाणी फ़ोटो काढणे. पर्यटकांचे लक्ष  केंद्रित करणे, असे प्रकार काही हुल्लडबाज करताना आढळूनयेतात. याबाबत स्थानिकांनी संबंधितांना हटकल्यास ‘तू तू मैं मै’ होते. त्यामुळे स्थानिक देखील याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात येथील रांजण खळगे पाण्याने पूर्ण भरतात. त्यामुळे पर्यटकांना त्याचा अंदाज येत नाही. पर्यटक अनोखळ्या ठिकाणी पोहण्याचे धाडस करतात व आपला जीव धोक्यात टाकतात; तसेच प्रसंगी प्राणास मुकतात. ‘सेल्फी’च्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.