Sat, Jun 06, 2020 06:11होमपेज › Pune › कृष्णा भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाचे काम बंद पाडले

कृष्णा भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाचे काम बंद पाडले

Published On: Apr 06 2018 1:29AM | Last Updated: Apr 06 2018 12:17AMडोर्लेवाडी : वार्ताहर 

कृष्णा भीमा जलस्थिरीकरण नदीजोड प्रकल्प हा केंद्र आणि राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याचे इंदापूर तालुक्यातील उद्धट बॅरेज या ठिकाणी सुरू असलेल्या बोगद्याच्या कामाची कुठलीही अधिकृत कल्पना न देता काम सुरू केल्याने बारामती तालुक्यातील सोनगाव येथील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी काम बंद पाडले आहे. जोपर्यंत आम्हाला या प्रकल्पाची पूर्ण माहिती दिली जाणार नाही आणि बाधित शेतीची योग्य भरपाईचे आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू करू देणार नाही, असा ठराव या वेळी ग्रामसभेत करण्यात आला.

सरपंच उज्ज्वला बोडरे यांच्या अध्यक्षतेखाली सभ पार पडली. या वेळी कृती समितीचे अध्यक्ष आनंद देवकाते,  विकास माने, उपसरपंच विराज देवकाते, शरद शिर्के, हरिभाऊ इंगवले, सदस्या शोभा माने, बाळासाहेब देवकाते, अमोल मंडले, जलसंपदा विभागाचे डेप्युटी इंजिनिअर आर. जे. खंदारे, सहाय्यक अभियंता आर. व्ही. घनवट, आर. बी. मिरगणे उपस्थित होते. कृष्णा भीमा जलस्थिरीकरण नदीजोड प्रकल्पाचे काम सुरू आहे. सध्या इंदापूर तालुक्यातील काझड, डाळज, भवानीनगरपर्यंत काम सध्या जोरात सुरू आहे. या ठिकाणी जमिनीपासून 100 फूट खोल खोदाई करून बोगद्यातून आतील खोदकाम सुरू आहे, हा बोगदा इंदापूर तालुक्यातील उद्धट बॅरेज या ठिकाणी संपणार आहे.

तिथून पुढे तो काही अंतरापर्यंत खुला राहणार आहे; मात्र उद्धट बॅरेज या ठिकाणी काम सुरू करण्यासाठी आलेल्या कर्मचारी यांना तीन दिवसांपूर्वी बारामती तालुक्यातील ग्रामस्थ आणि शेतकरी यांनी कामास विरोध करीत तेथून खोदकाम करण्यासाठी आणलेल्या कर्मचार्‍यास काम बंद करण्यास भाग पाडले. या प्रकल्पाबाबत पूर्ण कल्पना मिळावी, यासाठी सोनगाव कृती समितीच्या वतीने बारामतीचे प्रांताधिकारी हेमंत निकम व तहसीलदार हनुमंत पाटील यांना लेखी पत्रव्यवहार केला आहे.

ग्रामसभेत ठराव करून काम बंद 

कृष्णा भीमा नदीजोड प्रकल्पाचे बारामती तालुक्यातील सोनगाव येथे सुरू असलेले काम उद्धट बॅरेजचे काम आम्ही थांबवले आहे. सोनगाव ग्रामपंचायत वतीने ग्रामसभा बोलावून ठराव केला आहे की, जोपर्यंत आम्हाला या प्रकल्पाची पूर्ण माहिती दिली जाणार नाही आणि बाधित शेतीची योग्य भरपाईचे आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही काम सुरू करून देणार नाही असा ठराव ग्रामसभेत करण्यात आल्याचे सोनगाव कृती समितीचे अध्यक्ष आंनद देवकाते यांनी सांगितले.

या प्रकल्पात कुणाचीही जमीन बाधित होणार नाही. यात नदीलगत असणारे क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही ग्रामसभेत अहवाल सादर केला आहे. यात भूसंपादनच्या दोन प्रक्रिया आहेत. पहिली म्हणजे खासगी वाटाघाटीने थेट खरेदी करणे आणि दुसरी म्हणजे रेडिरेकनरचा दर किंवा मागील तीन वर्षांपूर्वीचा दर यापैकी जो जास्त असेल त्याच्या पाचपट रक्कम थेट मिळणार आहे.

 

Tags : pune, pune news, Krishna Bhima, Water, Stabilization Project, stopped,