Wed, Jun 26, 2019 12:14होमपेज › Pune › क्रांतिदिनी राज्यभरात जनआंदोलन 

क्रांतिदिनी राज्यभरात जनआंदोलन 

Published On: Jul 30 2018 1:31AM | Last Updated: Jul 30 2018 1:03AMपुणे : प्रतिनिधी

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्‍काचं... नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतं देणार नाय... घेतल्याशिवाय राहणार नाय..., जय जिजाऊ, जय शिवराय... आदी घोषणांनी सकल मराठा क्रांती मोर्चातील कार्यकत्यार्र्ंनी डेक्‍कन ते शिवाजीनगरचा परिसर अक्षरश: दणाणून सोडला. राज्यभरातील मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गंभीर गुन्हे तत्काळ रद्द करावेत, या मागणीसाठी रविवारी  सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे ‘निषेध मोर्चा’ काढण्यात आला. त्यावेळी  आरक्षण मिळण्यासंदर्भात सकल मराठा समाजाला विश्‍वास देऊन तशी ठोस भूमिका जाहीर करावी, अन्यथा येत्या ऑगस्ट क्रांतिदिनी 9 ऑगस्ट रोजी राज्य सरकारविरोधात  राज्यात जनआंदोलन उभारण्यात येईल. या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र बंद राहील, अशा इशारा आंदोलकांनी दिला. 

सकल मराठा क्रांती मोर्चा, पुणे जिल्ह्याच्या वतीने डेक्‍कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत रविवारी निषेध मोर्चा काढून राज्य सरकारच्या दुटप्पी आणि वेळकाढूपणाच्या धोरणाबद्दल संताप व्यक्त केला. या निषेध मोर्चामध्ये मराठा मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, विकास पासलकर, तुषार काकडे, बाळासाहेब आमराळे, विराज तावरे, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ, रघुनाथ चित्रे, धनंजय जाधव, मीना जाधव, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, अरविंद शिंदे, बाळासाहेब बोडके यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते व सकल मराठा समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद जिल्ह्यात काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर जगन्नाथ सोनवणे यांनीदेखील विष घेऊन मृत्यूला कवटाळले.  या घटनानंतर राज्यातील सकल मराठा समाजाने ठिकठिकाणी तीव्र आंदोलन केले. या दरम्यान, मराठा आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. हे सर्व गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, या मागणीसोबतच सरकारचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील सकल मराठा क्रांती मोर्चातर्फे हा निषेध मोर्चा काढण्यात आला.  डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साडेअकरा वाजता मोेर्चाला प्रारंभ झाला.

एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्‍काचं... नाही कुणाच्या बापाचं अशा गगनभेदी घोषणा देत कार्यकर्ते बालगंधर्व रंगमंदिर चौकात आले. येथून पुढे पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूने शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी या मोर्चाचा समारोप करण्यात आला. शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सरकारला सादर करण्यात येणार्‍या मागण्यांचे निवेदन ठेवण्यात आले. त्यानंतर सदर निवेदनाचे मुलींच्या हस्ते वाचन करून शहीद झालेल्या मराठा बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलनही करण्यात आले.  

घटनेच्या चौकटीत आरक्षण द्या 

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभर मराठा आंदोलन पेटत चालले आहे. सरकारने मराठा आरक्षणाबाबत त्वरित ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. घटनेच्या चौकटीत राहून आरक्षण द्यावे. परंतु, हे मराठा आरक्षण देताना घाई करू नये.  न्यायालयात ते टिकले पाहिजे, याचीही काळजी घ्यावी.    - राजेंद्र कोंढरे, राज्य समन्वयक, सकल मराठा क्रांती मोर्चा

सरकारने विश्‍वास द्यावा

मराठा आरक्षणाबाबत राज्यभरामध्ये विविध ठिकाणी आंदोलने होत आहेत.ही आंदोलने राज्य सरकारकडून दडपण्याचा प्रयत्न सुरू असून आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्‍वासन सरकारने दिले असले तरी त्यात विश्‍वासार्हता आढळत नाही.  त्यामुळे सर्वप्रथम आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेऊन मराठा आरक्षणाबाबतची ठोस भूमिका घ्यावी.     - विकास पासलकर, केंद्रीय निरीक्षक, संभाजी ब्रिगेड.