Mon, Jul 22, 2019 14:13होमपेज › Pune › कोरेगाव भीमा हिंसाचारातील नुकसानीचे झाले फेरमूल्यांकन

कोरेगाव भीमा हिंसाचारातील नुकसानीचे झाले फेरमूल्यांकन

Published On: Feb 24 2018 1:13AM | Last Updated: Feb 24 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी    

कोरेगाव भीमा येथे  उसळलेल्या हिंसाचारातील नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने केले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने बांधकाम विभागाकडून नुकसानीचे फेरमूल्यांकन करून घेतले असून, 7 कोटी 98 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती त्यातून समोर आली आहे. या फेरमूल्यांकनासाठी जिल्हा प्रशासनाने समिती नेमली होती. नुकसानग्रस्तांना येत्या दोन ते तीन दिवसांत राज्य शासनाकडून भरपाई मिळणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.  

तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने राज्य शासानाला आर्थिक मदतीसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने नुकसानीचे फेरमूल्यांकन केले आहे. रक्‍कम प्राप्त झाल्यानंतर 2016 ला प्रसिद्ध झालेल्या  शासन निर्णयानुसार प्रत्येक बाबीच्या नुकसानीचेे मूल्यांकन करून नुकसानभरपाई दिली जाणार आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

कोरेगाव भीमा येथील हिंसाचारामध्ये 9 कोटी 48 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. 169 ठिकाणी करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये 88 चारचाकी गाड्या, 67 दुचाकी, 14 घरे, तीन बसेस, आठ ट्रक, 63 हॉटेल आणि दुकाने आदींचा समावेश करण्यात आला होता. कोरेगाव भीमा आणि सणसवाडी अशा दोन गावांमध्ये मिळून एकूण 9 कोटी 48 लाख 54 हजार 865 रुपयांचे नुकसान झल्याचे प्राथमिक पंचनाम्यात नमूद करण्यात आले होते. त्यात कोरेगाव भीमा या गावात 7 कोटी 5 लाख 44 हजार रुपयांच्या मालमत्तेचे तर, सणसवाडी गावात 2 कोटी 43 लाख 10 हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले होते; मात्र फेरमूल्यांकनात नुकसानीचा आकडा आता 7 कोटी 98 लाख रुपये झाला आहे.

नुकसानग्रस्तांना मदत देण्याचा प्रयत्न

कोेरेगाव भीमा आणि सणसवाडी येथे झालेल्या हिंसाचारातील नुकसान झालेल्या सर्वांना नियमानुसार आर्थिक मदत दिली जाणार आहे. नुकसानग्रस्त एकही व्यक्ती मदतीपासून वंचित राहणार नाही, याची प्रशासनाकडून दक्षता घेतली जात आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सांगितले.