होमपेज › Pune › रात्र निवारा केंद्र की कोंडवाडा?

रात्र निवारा केंद्र की कोंडवाडा?

Published On: Dec 18 2017 2:41AM | Last Updated: Dec 18 2017 12:56AM

बुकमार्क करा

पिंपरी : पूनम पाटील

शहरात बेघर नागरिक मोठ्या संख्येने  राहात असून, मोलमजुरी करून किंवा भीक मागून आयुष्य जगत आहेत. त्यांना रात्र फुटपाथवर किंवा रस्त्याच्या बाजूला काढणार्‍यांच्या निवार्‍यासाठी पालिकेच्या वतीने भाटनगर येथे रात्र निवारा केंद्र उभारण्यात आले. परंतु सद्य:स्थितीत या निवारा केंद्राची अवस्था पाहता महापालिकेने हा उपक्रम गांभीर्याने घेतलेेला दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. केवळ शासकीय आदेशाचे पालन करण्यात आले असून, निवारागृह सक्षमपणे चालले पाहिजे, यादृष्टीने कोणतेही प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या काळात तात्पुरत्या सोयी करण्यात आल्या. मात्र आता हे निवारा केंद्र गैरसोयींनी परिपूर्ण झाले आहे. त्यामुळे महापालिकेला हे निवारा केंद्र चालवायचे आहे की, नाही असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहात नाही. 

निवारा केंद्रात पाणी नसल्याने आंघोऴ न करताच निघून जातात; तसेच शौचालयेही अस्वच्छ असून, त्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते. या ठिकाणी येणार्‍या-जाणार्‍यांची नोंदणी केलेल्या कागदांसाठी फाईलच नाहीत. भविष्यात जर गुन्हे घडले तर नेमके कोणकोण मुक्कामी होते, याची माहिती मिळणे मुश्कील आहे. येथे दोनच सुरक्षारक्षक असून निवारा केंद्राच्या आसपास घाणीचे साम्राज्य आहे.
अपुरी प्रकाश व्यवस्था, फाटलेल्या गाद्या सध्या हिवाळा सुरू आहे. परंतु येथे गाद्यांची अवस्था वाईट असून त्यांच्या खोळी फाटल्या आहेत. तसेच उशांना कव्हर नाहीत व पांघरायला पुरेसे ब्लँकेट नाहीत. खाटांची संख्या कमीच आहे. हिवाळ्यात पंख्याची गरज नसली तरी उन्हाळ्यात मात्र पंखा नसल्याने रात्री हाल होतात. भल्यामोठ्या हॉलमध्ये केवळ एक बल्ब असून कोंदट वातावरण आहे. बाहेरच्या बाजूसही केवळ एक किंवा दोनच बल्ब असल्याने निवाराकेंद्राची अवस्था कोंडवाड्यासारखीच झाली आहे. निवारागृहात प्रवेश केल्यावर येणारा कुबट व दुर्गंधीयुक्त वासाने डोके दुखते. तसेच डासांचे प्रमाणही वाढले आहे.