दहा लाखांच्या खंडणीसाठी डॉक्टरचे अपहरण

Last Updated: Jun 04 2020 12:55AM
Responsive image


पुणे : पुढारी वृत्तसेवा

गर्भलिंग  निदान चाचणी केली नसतानादेखील ती केल्याचे भासवून ब्लॅकमेल करीत दहा  लाखांच्या खंडणीसाठी एका डॉक्टरचे रुग्णालयातून अपहरण केल्याचा धक्‍कादायक  प्रकार भेकराईनगर हडपसर परिसरात घडला. सात लाखांवर तडजोड करून  5 लाख 89 हजारांची खंडणी उकळल्यानंतर आरोपींनी डॉक्टरांची सुटका केली. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने पुण्यातील एका पोलिस कर्मचार्‍यासह चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. गुन्ह्याची मुख्य सूत्रधार ही बारामतीची महिला असल्याचे तपासात समोर आले आहे.

स्वयंघोषित पत्रकार प्रदीप ज्ञानदेव फासगे (37, रा. मांजरी), कैलास  भानुदास अवचिते (38, रा. हडपसर), पोलिस कर्मचारी समीर जगन्नाथ थोरात (रा. हडपसर), आरती प्रभाकर चव्हाण (29, फुरसुंगी) या चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या इतर साथादारांचा शोध गुन्हे शाखेकडून घेतला जात आहे. एकूण सात जणांविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला. याप्रकरणी कोंढव्यातील (मूळ फलटण)  एका 48 वर्षीय डॉक्टरने फिर्याद दिली आहे.

  गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त बच्चन सिंह यांनी सांगितले की, आतापर्यंत चौघांना अटक केली असून, तपास सुरू आहे. यामध्ये एखादे रॅकेट तर सक्रिय नाही ना, याचादेखील शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. फिर्यादी डॉक्टर हे स्त्रीरोगतज्ज्ञ असून, तीन वर्षांपासून ते हडपसर येथील एका रुग्णालयात  प्रॅक्टिस करतात. त्यांच्या रुग्णालयात एक महिला वैद्यकीय तपासणीसाठी पेशंट म्हणून आली होती. डॉक्टर हे तिला तपासत असताना, तिने मुद्दाम आरडा-ओरडा केला. त्या वेळी बाहेर थांबलेले आरोपी महिलेचे साथीदारांनी रुग्णालयात आत येऊन त्यांना व त्यांचे सहकारी डॉक्टर यांना पोलिस असल्याची बतावणी करून मारहाण केली. त्यानंतर एका चारचाकी गाडीत बसवून जबरदस्तीने दोघांचे अपहरण केले.  सासवड रोडवरील एका ऑफिसमध्ये त्यांना डांबून ठेवले. त्या ठिकाणी डॉक्टरांना आरोपीपैकी दोघांनी पत्रकार असल्याची बतावणी करून तुमची बदनामी होईल, असे म्हणत प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाखांच्या खंडणीची मागणी केली. मारहाण  व बदनामीच्या भीतीने डॉक्टरांनी सात लाख रुपये खंडणीपोटी देण्याचे कबूल केले.  लॉकडाऊनमुळे एवढे पैसे जमा करणे शक्य नसल्याचे सांगून डॉक्टरांनी त्यांचे नातेवाईक व मित्रांकडून पाच लाख 89 हजार रुपये जमा करून आरोपींच्या हवाली केले. त्यानंतर आरोपींनी कोणालाही काही न सांगण्याची धमकी देत सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुटका केली. त्यानंतर फिर्यादींनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्‍त अशोक मोराळे, उपायुक्‍त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत असताना, निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या पथकाने बुधवारी सहाच्या सुमारास पोलिस कर्मचारी व त्यांच्या इतर चौघा साथादारांना बेड्या ठोकल्या.