Sat, Jul 20, 2019 11:24होमपेज › Pune › बाळाचे फूटपाथवरून अपहरण

बाळाचे फूटपाथवरून अपहरण

Published On: Jan 10 2018 1:59AM | Last Updated: Jan 10 2018 1:22AM

बुकमार्क करा
पुणे : प्रतिनिधी

बंडगार्डन परिसरातील फुटपाथवर आई-वडिलांच्यामध्ये झोपलेल्या चौदा महिन्यांच्या बाळाचे मध्यरात्री अपहरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कुटुंबीय फुटपाथवर खेळणी विकतात. दरम्यान, या बाळाला भीक मागण्यासाठी उचलून नेल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बाळाच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञातांविरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळाचे आई-वडील दिवसभर बंडगार्डन परिसरातील फुटपाथवर लहान-मुलांची खेळणी; तसेच फुगे विक्री करण्याची कामे करतात. ते मालधक्का चौकातील ससून रुग्णालयाच्या भिंतीलगत फुटपाथवर राहतात. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री फिर्यादी व त्यांची पत्नी बाळाला दोघांच्या मध्ये घेऊन झोपले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने दोघांच्यामध्ये झोपलेले बाळ उचलून नेले. आई-वडिलांना पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास जाग आली. त्यावेळी त्यांना बाळ नसल्याचे लक्षात आले. त्यांनी परिसरात शोध घेतला. परंतु, बाळ मिळून आले नाही. त्यानंतर त्यांनी तत्काळ बंडगार्डन पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर हा प्रकार समोर आला. वरिष्ठ अधिकार्यांसह कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. त्यात तीन ते सव्वा तीन या वेळेत एक व्यक्ती बाळाला उचलून नेत असल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, बाळाचे आई-वडील व नातेवाईकांना हे फुटेज दाखविण्यात आले आहे. मात्र, ते संबंधित व्यक्तीला ओळखत नाहीत. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. दरम्यान, बाळाचे अपहरण भीक मागण्यासाठी करण्यात आले असावे, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.