Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Pune › अपहृत ८ महिन्यांच्या मुलीची सुटका

अपहृत ८ महिन्यांच्या मुलीची सुटका

Published On: Feb 13 2018 2:01AM | Last Updated: Feb 13 2018 1:40AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे स्टेशनवरून अपहरण झालेल्या 8 महिन्यांच्या मुलीची सात दिवसांत सुटका करण्यात रेल्वे पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून, अपहरणकर्त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्‍कलकोट येथून रोजगारासाठी पुण्यात आलेल्या कुटुंबातील 8 महिन्यांची मुलगी गौरी हिचे अपहरण करण्यात आले होते. पुणे रेल्वे स्टेशनच्या आवारातील दर्ग्याजवळून सोमवारी (दि. 5) रोजी रात्री 9 ते 10 वाजेच्यादरम्यान मुलीचे अपहरण करण्यात आले होते. 

अनुष्का रवींद्र रणपिसे ऊर्फ रंजना जगन्नाथ पांचाळ (वय 29, रा़ वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळगाव रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे़  मूल होत नसल्याने तिने मित्राच्या मदतीने हे बाळ पळविले होते, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे़ 

याप्रकरणी लक्ष्मी गेनसिद्ध चाबुकस्वार (वय 28, रा़ अक्कलकोट) यांनी रेल्वे पोलिसांकडे फिर्याद दिली होती़  ती, तिचा पती व 8 महिन्यांची मुलगी गौरी असे तिघे 3 फेब्रुवारीला पुण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी त्यांनी हडपसर येथे एका ठिकाणी वाढपी म्हणून काम केले. राहायला जागा नसल्याने ते रेल्वे स्टेशनजवळील दर्ग्याजवळ थांबले होते. 5 फेब्रुवारीला त्यांना काही काम मिळाले नाही़  त्यामुळे पुन्हा गावी जावे, असा त्यांचा विचार होता़  त्या रात्री ते दर्ग्याजवळ थांबले असताना एक महिला तेथे आली, तिने त्यांची चौकशी केली़  मुलीसाठी कपडे दिले़ नंतर तिने आपल्या भाच्याला बोलावून घेतले. 

तुम्ही जेवण करून या, मी मुलीला सांभाळते, असे सांगितले. तिच्यावर विश्वास ठेवून ते भाच्याबरोबर जेवायला गेले. मधूनच तो भाचा निघून गेला़  ते जेवण करून परत आले तर ती बाई व मुलगी तेथे नव्हते. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण ती कोठेच न सापडल्याने त्यांनी रेल्वे पोलिसांकडे धाव घेतली़ 

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेण्यास सुरुवात केली़  रेल्वे पोलिस तसेच पुणे शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी पथक एकत्रितपणे तपास करीत होते़  सदर महिला वाल्हेकरवाडी येथे असल्याची माहिती मिळाल्याने तपास पथकाने तेथे जाऊन सोमवारी सायंकाळी तिला पकडले व मुलीची सुटका केली़ अधिक तपास रेल्वे पोलिस करीत आहेत़