Wed, Apr 24, 2019 07:42होमपेज › Pune › येळकोट येळकोट जयमल्हार...    

येळकोट येळकोट जयमल्हार...    

Published On: Dec 19 2017 1:16AM | Last Updated: Dec 18 2017 11:46PM

बुकमार्क करा

जेजुरी :  

येथे सोमवती यात्रेनिमित्त खंडेरायाच्या दर्शनासाठी आणि कर्‍हास्नान, कुलधर्म-कुलाचारासाठी सुमारे 3 लाख भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी खंडेरायाच्या पालखी सोहळ्यावेळी जेजुरी गडावर आणि कर्‍हा नदीवर लाखो भाविकांनी भंडार्‍याची उधळण करीत, ‘सदानंदाचा येळकोट... येळकोट...येळकोट, जयमल्हार’ असा जयघोष केला.                                                                                     

सोमवती यात्रेनिमित्त जेजुरी गडावरून श्री खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा काढला जातो. गडापासून पाच ते सहा किमी अंतरावरील कर्‍हा नदीवरील पापनाश तीर्थावर या उत्सवमूर्तींना पंचामृत व कर्‍हेच्या पाण्याने अंघोळ घातली जाते. हा अवर्णनीय सोहळा पौराणिक काळापासून सुरू आहे.

सोमवती यात्रेनिमित्त रविवारपासूनच शहरात राज्यातील विविध ठिकाणांवरून आलेल्या भाविकांची  कुलधर्म-कुलाचार व देवदर्शनासाठी गर्दी  झाली होती. सोमवारी (दि. 18) अमावस्या सकाळी 11 वाजून 59 मिनिटांनी संपणार असल्याने पहाटे साडेपाच वाजता गडाच्या पायथ्याशी जमलेले देवाचे मानकरी, पालखी सोहळ्याचे खांदेकरी वाजतगाजत गडावर आले. सकाळी सहा वाजता देवाचे मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे यांनी इशारा करताच पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला.

यावेळी देवसंस्थानच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून सोहळ्याला सलामी देण्यात आली.  पालखीसमोर निशाण, छत्र-चामर-अब्दागिरी तसेच घडशी समाजबांधवांच्या वतीने सनईचे मंगलमय सूर निनादत होते. मंदिर प्रदक्षिणेनंतर भंडारगृहातील श्री खंडोबा व म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आल्या.   पालखी सोहळा गडावरून निघताच हजारो भाविकांनी ‘येळकोट येळकोट जयमल्हार’चा जयघोष केला.