Tue, Apr 23, 2019 01:35होमपेज › Pune › खंडाळा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

खंडाळा घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 27 2018 12:28AMलोणावळा : वार्ताहर 

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे लोहमार्गादरम्यानच्या खंडाळा घाटात दरड कोसळण्याचे सत्र रविवारीदेखील सुरूच होते. खंडाळा रेल्वे स्टेशनच्या पुढे अमृतांजन पुलाजवळ शनिवारी (दि. 25) रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास रेल्वेच्या अप आणि मिडल लाईनवर मोठी दरड कोसळल्याने लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवर परिणाम झाला होता. ही दरड हटविण्याचे काम सुरू असतानाच रविवारी (दि. 26) दुपारी पुन्हा याच ठिकाणी दरड खाली आल्याने रेल्वेसेवा पुन्हा विस्कळीत झाली होती.

शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास खंडाळा घाटातील अमृतांजन पुलाजवळ लोहमार्ग किलोमीटर क्रमांक 121 येथे लोहमार्गाच्या अप आणि मिडल लेनवर दरड कोसळली. या दरडीसोबत मोठमोठे दगड रेल्वे ट्रॅकवर आले. सदर घटनेची माहिती समजताच मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत घटनेची पाहाणी करत लोहमार्गावरील दरड  युद्धपातळीवर हटविण्याचे काम सुरू करण्यात केले. 4 तासानंतर रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास अप लाईनवरील दगड बाजूला करून रेल्वेसेवा पुन्हा धीम्या गतीने पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान मिडल लाईन तसेच या दोन्ही ट्रॅकच्या बाजूला दरडीसोबत आलेले दगड बाजूला करण्याचे काम सुमारे 300 कर्मचार्‍यांच्या मदतीने रविवारीदेखील सुरू ठेवण्यात आले होते. हे काम सुरू असतानाच दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान पुन्हा एकदा याच ठिकाणी एक दरड खाली ट्रॅकवर कोसळली. यामुळे पुन्हा एकदा रेल्वेसेवा बाधित झाली होती. ही दरड बाजूला करण्याचे काम रेल्वे कडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. मात्र या दरम्यान भुसावळ एक्सप्रेस लोणावळा स्थानकात तट खंडाळा स्टेशनमध्ये चेन्नई एक्सप्रेस थांबविण्यात आली होती. मळवली स्टेशनमध्ये कर्जत शटल थांबवली, तर मळवली आणि कामशेतदरम्यान कुर्ला एक्सप्रेस काही काळ थांबवून धरण्यात आली होती.