Wed, Apr 24, 2019 20:19होमपेज › Pune › खंडाळ्याचा घाट रेल्वेसाठी धोकादायक

खंडाळ्याचा घाट रेल्वेसाठी धोकादायक

Published On: Aug 30 2018 1:58AM | Last Updated: Aug 30 2018 1:26AMपुणे : 

पुणे-मुंबई लोहमार्गावरील खंडाळा घाट रेल्वेसाठी अत्यंत धोकादायक ठरत असल्याचे सद्यःस्थितीवरून दिसत आहे. नुकतेच दि. 24, 25 व 26  ऑगस्ट रोजी लागोपाठ तीन दिवस मंकी हिलजवळ दरड कोसळली. सुदैवाने त्या वेळी तेथून कोणतीही गाडी जात नव्हती; अन्यथा मोठा अनर्थ घडू शकला असता. ही दरड रात्रीच्या सुमारास पडल्याने पुणे-मुंबईदरम्यान धावणार्‍या एक्स्प्रेस गाड्या विस्कळीत झाल्या नाहीत; परंतु कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेससह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना दरड कोसळण्याचा फटका बसला व त्यांना नियोजित वेळेपेक्षा उशीर झाला. 

लोणावळा-खंडाळ्याच्या घाटात रेल्वे मार्गावर दोन्ही बाजूंना संरक्षक जाळ्या काही मोजक्या ठिकाणीच बसवल्या आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येथून मोठ-मोठे धबधबे वाहत असतात. यामुळे दगड सैल होऊन ते मार्गावर पडण्याची शक्यता आहे. खंडाळ्याचा घाट 20 ते 25 किलोमीटर लांबीचा असून, येथे सर्वच ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्यात याव्यात, खंडाळा घाटातील बहुतांश भाग मुंबई विभागांतर्गत येत असून, या संपूर्ण घाटात ड्रोन बसविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. ड्रोनमुळे दरडींचा धोका क्षणार्धात ओळखून संभाव्य अपघात वाचविता येऊ शकेल; परंतु अद्यापही ड्रोनला मुहूर्त लागला नसून, लवकरात लवकर ते कार्यान्वित केले जावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

घाटातील दगड जीर्ण

खंडाळ्याचा घाट ब्रिटिश काळात बांधण्यात आला आहे; परंतु त्याला दीडशे वर्षे उलटली असून, दगडावरून पावसाचे पाणी जाऊन-जाऊन दगड जीर्ण झाले आहेत; त्याचप्रमाणे मातीदेखील भुसभुशीत झाली आहे. पुणे-मुंबई रेल्वे मार्ग हा सर्वाधिक व्यस्त मार्ग असून, येथून दर दहा मिनिटांना एक रेल्वे धावते. रेल्वे जात असताना डोंगराला कंपने जाणवतात. वर्षानुवर्षे येथील डोंगर ही कंपने सहन करत असून, यामुळे घाट परिसरातील दगड सैल होत असून, अलीकडच्या काळात दरड कोसळण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाल्याचे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने  सांगितले.