Tue, Apr 23, 2019 01:58होमपेज › Pune › खड्डेमुक्‍त पिंपरी-चिंचवडचा पोकळ दावा

खड्डेमुक्‍त पिंपरी-चिंचवडचा पोकळ दावा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिंपरी : प्रतिनिधी

राज्यातील रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची मुदत राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली होती; परंतु ही मुदत उलटून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरी रस्ते खड्डेमयच आहेत. तीच परिस्थिती पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण शहर खड्डेमुक्‍त केल्याचा दावा सत्ताधारी व महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण शहरात याउलट परिस्थिती आहे. विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसून, या खड्ड्यांमुळे अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मुश्कील झाले असून, हे खड्डे कधी बुजवणार, असा संतप्त सवाल वाहनचालक करत आहेत. 

श्रीधरनगर, चिंचवड, जयहिंद हायस्कूल, पिंपरीतील तपोवन मंदिर परिसर, ताथवडे चौक, संघवी केसरी महाविद्यालय, चिंचवड; तसेच वाल्हेकरवाडी ते रावेत रस्त्याची विविध विकासकामांसाठी खोदाई करण्यात आली होती; मात्र वारंवार सांगूनही महिनोंनमहिने उलटून गेल्यानंतरही संबंधित ठेकेदारांकडून हे खड्डे बुजवण्यात आले नाहीत. या रस्त्यांमुळे अनेकदा अपघात घडले आहेत; परंतु परिस्थिती ‘जैसे थे’च आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातात एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होईल का, असा संतप्त सवाल नागरिक  करत आहेत. प्रशासकीय पातळीवर या खड्ड्यांबाबत कोणीही काही बोलायला तयार नाही. वाहनधारक मात्र यामुळे बेजार झाले आहेत. काही ठिकाणी केवळ दिखाव्यापुरतेच डांबरमिश्रित खडीने रस्ता बुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र रोजची वाहनांची वर्दळ असल्याने काही दिवसांतच हा मुरूम नाहीसा झाला आणि त्या ठिकाणी परत मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे रस्ते कधी बुजवणार, असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. 

Tags : Pune Pimpri, Pimpri News, Khadde, free, Pimpri Chinchwad, Hollow, Claims


  •