Fri, Jul 19, 2019 14:15होमपेज › Pune › पाणीटंचाईचे संकट पुण्याच्या वेशीवर

आज धरणात नाही, तर उद्या नळात कोठून येणार?

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 23 2018 1:24AMपुणे : प्रतिनिधी 

पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरणसाखळीत फेब्रुवारीमध्येच तीव्र पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्याने, यंदाच्या उन्हाळ्यात पुणेकरांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण बरे राहिल्याने सध्या तरी पुणेकरांना त्याची झळ जाणवत नाही; मात्र, वेळीच काळजी न घेतल्यास पुणेकरांना पुन्हा अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पुणे शहरास पाणीपुरवठा करणार्‍या पानशेत, टेमघर, वरसगाव आणि खडकवासला या धरणसाखळी क्षेत्रात सध्या तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गळतीमुळे टेमघर धरण आधीच कोरडे पडले असताना, वरसगाव धरणातूनही गळती होत असल्याचे समोर आले आहे. या पार्श्‍वभूमीवर पुणेकरांनाही सध्या काही प्रमाणात पाण्याची चणचण सहन करावी लागत आहे. खडकवासला धरणातील पाणी साठ्याचा विचार करता हे पाणी आगामी उन्हाळ्यात पुणेकरांची तहान भागवेल का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. एकंदरीत यंदाच्या उन्हाळ्यात ही टंचाई उग्र रूप धारण करू शकते. त्यामुळे पाणी वापरताना आतापासूनच पुणेकरांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

पुणेकरांच्या पाणी वापरावर अनेक वेळा विविध तज्ज्ञांनी अक्षेप घेतला आहे. दुसरीकडे पुणेकर ठरवून दिलेल्या हिश्श्यापेक्षा जास्त पाणी वापरतात. यावर योग्य ते नियंत्रण न ठेवल्यास पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा काही महिन्यांपूर्वी राज्याच्या जलसंपदा विभागाने दिला होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर येणारा उन्हाळा सुकर जाण्यासाठी पुणेकरांनी आतापासूनच पाणी वापरावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.

पाण्याला गेलेली मुलगी होरपळली

वेल्हे तालुक्यातील चांदर येथील गोगटे वस्ती धनगरवाड्यातील संगीता विठ्ठल ढेबे (15) ही मुलगी दुर्गम जंगलातून पाणी आणताना लागलेल्या भीषण वणव्यात होरपळून गंभीर जखमी झाली आहे. कड्यातील झर्‍यातून पाणी वाटीने हंड्यात भरत असताना डोंगराला अचानक चोहोबाजूंनी लागलेल्या भीषण वणव्यात होरपळून जागीच बेशुद्ध पडली.