Wed, Jun 26, 2019 17:51होमपेज › Pune › खडकवासलातून महिनाअखेरपासून शेतीला पाणी

खडकवासलातून महिनाअखेरपासून शेतीला पाणी

Published On: Jan 21 2018 2:52AM | Last Updated: Jan 20 2018 11:14PMखडकवासला : वार्ताहर

खडकवासला धरणातून महिनाअखेरीस  इंदापूर, दौंड, हवेली आदी तालुक्यांतील हजारो हेक्टर शेतीला रब्बी आवर्तनाचे दुसर्‍या टप्प्यातील पाणी सोडण्यास सुरुवात होणार आहे. उन्हाळ्यात पुणेकरांनाही पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे.

रब्बी आवर्तनाचे पहिल्या टप्प्यातील पाण्याला शेतकरयांची मागणी नसल्याने नियोजित वेळे पुर्वी पहिल्या टप्प्यातील पाणी सोडणे बंद करण्यात आले.त्यामुळे रब्बी आवर्तनाच्या  दुसर्‍या टप्प्यात साडेचार टिएमसी पाणी  सोडण्यात येणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत खडकवासला धरणसाखळीत दीड टिएमसी जादा पाणी साठा आहे. सध्या चार धरणांच्या खडकवासला धरणसाखळीत 71.38 टक्के म्हणजे 20.80 टिएमसी इतका पाणी साठा आहे.  

पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा करणारया खडकवासला धरणसाखळीत गेल्या   वर्षाच्या तुलनेत अधिक पाणी साठा आहे.  त्यामुळे यंदाच्या रब्बी तसेच उन्हाळी हंगामात शेती व पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करणारयावर  जिल्हा प्रशासनाने भर दिला आहे. त्यासाठी खडकवासला जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. हवेली ,दौंड,इंदापुर आदी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती तसेच लाखो रहिवाशांची तहान खडकवासला धरणसाखळीवर भागवली जात आहे. पुणे शहर व परिसराची लोकसंख्या दहा  -पंधरा वर्षात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मागणी वाढली आहे.

जिल्ह्यासह शहरातील जवळपास एक कोटी नागरिकांची तहान भागविण्यासाठी  खडकवासला धरणसाखळीला पर्यायी व्यवस्था नाही.त्यामुळे गेल्या दहा पंधरा वर्षांपासून उन्हाळ्यात   शेती च्या  पाणी पुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. अशी गंभीर समस्या निर्माण होऊ नये यासाठी यंदा जलसंपदा विभागाने वेगाने नियोजन केले आहे. खडकवासलातून    रब्बी आवर्तनाचे पहिल्या टप्प्यातील पाणी सोडणे   गेल्या महिन्यात  दहा डिसेंबर रोजी सुरू केले. पन्नास दिवसात साडेचार टिएमसी पाणी सोडण्यात येणार होते.मात्र शेतकरयांची मागणी नसल्याने 4 जानेवारी रोजी रब्बीचे पाणी बंद करण्यात आले. 25 दिवसांत दोन टिएमसी इतके पाणी  सोडण्यात आले.त्यामुळे अडीच टिएमसी पाणी शिल्लक राहिले. 

खडकवासला जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता राजकुमार क्षिरसागर म्हणाले , पहिल्या टप्प्यातील पाणी वेळे आधी बंद करण्यात आले.त्यामुळे शिल्लक पाण्यासह साडेचार टिएमसी पाणी रब्बी च्या दुसरया टप्प्यात सोडण्यात येणार आहे. चालू जानेवारी महिन्याच्या अखेरीस शेतीला पाणी सोडण्यात येणार आहे. जवळपास दोन महिने पाणी सोडण्यात येणार आहे.खडकवासला पासून 202 किलो मीटर अंतराच्या मुठा कालव्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या इंदापुर पर्यंतच्या  शेतीला रब्बी आवर्तनाचे पाणी मिळणार आहे. 

खडकवासला धरणातून पुणे शहर व परिसराला बंद जलवाहीकेतून पाणी सोडण्यात येत असल्याने पाण्याची बचत होत आहे. त्यामुळे पिण्यासह शेतीला लाभ होत आहे.असे जलसंपदा विभागातुन सांगण्यात आले. जिल्ह्याच्या पुर्व भागातील हवेली ,दौंड, इंदापुर आदी तालुक्यातील 66 हजार हेक्टर शेती तसेच येथील लाखो रहिवाशांसह व पुणे शहर व परिसराल जवळपास एक कोटी नागरिकांची तहान खडकवासला धरणसाखळीतील पानशेत ,वरसगाव ,खडकवासला व टेमघर या चार धरणांवर भागवली जात आहे. गळती बंद करण्याच्या कामासाठी  टेमघर धरण रिकामे करण्यात आले. त्यामुळे उर्वरित तीन धरणातील पाण्यावर सध्या पाणी पुरवठा केला जात आहे. 

खडकवासला धरणाची पाणी साठवण क्षमता 29.15  टिएमसी इतकी आहे. सध्या धरणसाखळीत  20.80 टिएमसी म्हणजे 70.38 टक्के इतका पाणी साठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी 19 जानेवारी  2017  रोजी धरणसाखळीत  19.25 टिएमसी म्हणजे 66.50 टक्के इतका पाणी साठा होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत दिड  टिएमसी इतका पाणी साठा जादा आहे. वरसगाव धरण  77.79 टक्के ,पानशेत धरणात 87.87 टक्के तर खडकवासला धरणात 74.30 टक्के इतका पाणीसाठा आहे.