Sun, Apr 21, 2019 04:36होमपेज › Pune › खडकवासला धरणसाखळीत उन्हाळ्याचे चटके

खडकवासला धरणसाखळीत उन्हाळ्याचे चटके

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 12:27AMखडकवासला : वार्ताहर

पुणे शहर व परिसरासह जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीला पाणी पुरवठा करणारया खडकवासला धरणसाखळीतील विस्तार्ण पाणलोट क्षेत्रात उन्हाळ्याचे चटके सुरू झाले आहेत.शेती व पिण्यासाठी पुर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असल्याने धरणसाखळीतील  पाणी साठयात वेगाने घट सुरू आहे.   आज रविवारी ( दिनांक 18) रोजी धरणसाखळीत 17.09 टिएमसी म्हणजे 58.62 टक्के इतका पाणी साठा शिल्लक होता. शेतीसाठी रब्बी आवर्तनाचे दुसरया टप्प्यातील पाणी 24 जानेवारी पासून सोडले जात आहे. तसेच पुणे शहर व परिसराला  पुर्ण क्षमतेने पाणी सोडले जात असल्याने  गेल्या 25  दिवसात साडे तीन टिएमसी इतक्या  पाण्याची घट झाली आहे. 

खडकवासला धरणसाखळीत गेल्या वर्षीही आजच्या दिवशी 18 फेब्रुवारी 2017 रोजी जवळपास इतका पाणी साठा धरणसाखळीत होता.गेल्या 18 फेब्रुवारी रोजी 16.50 टिएमसी म्हणजे 56.61 टक्के इतका पाणी साठा होता. जिल्हा प्रशासन व जलसंपदा विभागाने यंदा पाणी बचतीवर भर देऊनही जवळपास गतवर्षीच्या इतका पाणी साठा आहे.त्यामुळे उन्हाळ्यात पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्याचे आवाहन उभे राहणार आहे. 

चार धरणाच्या  धरणसाखळीतील टेमघर धरण कोरडे पडले असल्याने  पानशेत व वरसगाव धरणावर पुणेकरांसह शेतीची तहान भागवली जात आहे. वरसगाव धरणातून 1350 व पानशेत धरणातून 600 क्युसेक्स वेगाने पाणी खडकवासलात सोडले जात आहे. त्यानुसार खडकवासलातून शेती व पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी सोडले जात आहे. खडकवासलातून मुठा कालव्यात 1401 क्युसेक्स वेगाने तसेच शहर व परिसराला पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणी साठयात वेगाने घट सुरू आहे. फेब्रुवारी महिना सुरु होताच उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. वरसगाव धरणात 61.18  टक्के व पानशेत मध्ये 74 .23 टक्के इतका पाणी साठा आहे. दोन्ही धरणातून पाणी सोडण्यात येत असल्याने दर तासागणिक पाणी साठयात घट सुरू आहे.  

गेल्या महिन्यात 24 जानेवारी रोजी धरणसाखळीत 20.50 टिएमसी इतका पाणी साठा होता.गेल्या तीन आठवड्यात पाणी साठयात तीन टिएमसीची घट झाली. शेतीसाठी रब्बी आवर्तनाचे दुसरया टप्प्यात साडेचार टिएमसी पाणी सोडले  जाणार आहे.अद्याप दोन ते तीन आठवडे पाणी सोडले  आहे.असे खडकवासला जलसंपदा विभागातुन सांगण्यात आले. टेमघर धरणाच्या गळतीचे काम अद्याप पुर्ण झाले नाही.टेमघर ची पाणी साठवण क्षमता 3.72 टिएमसी इतकी आहे. त्यामुळे यंदाही उन्हाळ्यात रिकाम्या   टेमघर चा पुणेकरांसह शेतीला बसणार आहे.