Fri, Apr 26, 2019 20:13होमपेज › Pune › केरळात सात दिवस अगोदर मान्सून धडकणार

केरळात सात दिवस अगोदर मान्सून धडकणार

Published On: May 13 2018 2:16AM | Last Updated: May 13 2018 1:45AMपुणे : प्रतिनिधी 

नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) आगमन यंदाच्या वर्षी केरळमध्ये वेळेआधीच होण्याचे संकेत मिळत आहेत. 25 मे रोजी दक्षिण केरळसह तामिळनाडूचा काही भाग, अरबी समुद्राच्या काही भागात मान्सून डेरेदाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मान्सून दरवर्षी सर्वसामान्यपणे दि. 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. मात्र, यंदाचे वर्ष त्याला अपवाद ठरण्याची चिन्हे दिसत असून, तो वेळापत्रकाच्या तब्बल 7 दिवस आधी दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गतवर्षी केरळमध्ये वेळापत्रकाच्या दोन दिवस अगोदर 30 मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. 

केरळ किनारपट्टीजवळ दि. 25 ते 27 मे दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज असून, त्या दरम्यान तेथे मुसळधार पाऊस पडेल, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर दि. 25 ते 31 मे दरम्यान दक्षिण-पूर्व अरबी समुद्रात वादळी वार्‍यांसह जोरदार पाऊस पडेल, असेही नमूद करण्यात आले आहे. वार्‍यांची दिशा बदलत असून, उत्तर भारत व बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे 
हळूहळू पश्‍चिम व नैर्ऋत्य दिशेकडून येत असल्याचे दिसत आहे. 

 दरम्यान, केरळमध्ये मान्सूनचे आगमन वेळापत्रकाआधीच होणार असले तरी अंदमान-निकोबार बेटांवर तो वेळापत्रकानुसारच म्हणजेच 20 मे रोजीच दाखल होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा येथे मान्सूनपूर्व मुसळधार सरी कोसळत असून, मान्सूनच्या आगमनासाठी ही चिन्हे अनुकूल असल्याचे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे. 

राज्यातील आगमनाबाबत आताच सांगणे कठीण
केरळमध्ये वेळापत्रकाच्या सात दिवस आधी मान्सूनचे आगमन होणार असल्याने राज्यातही त्याचे आगमन लवकर होण्याची शक्यता आहे. मात्र, आताच याबाबत सांगता येणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. कमी दाबाचे क्षेत्र, मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण, हवेचे दाब, हवेतील बाष्पाचे प्रमाण, आदी गोष्टींवर मान्सूनची पुढील वाटचाल अवलंबून असते. यामुळे केरळमधील त्याच्या आगमनानंतरच राज्यातील आगमनाची निश्‍चित तारीख समजू शकेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्यात सर्वसाधारणपणे मान्सून दि. 7 जून रोजी दाखल होतो व दि. 12 जूनपर्यंत संपूर्ण राज्य व्यापतो. त्याचप्रमाणे 15 जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो.