Tue, Nov 20, 2018 16:55



होमपेज › Pune › बहुजन मतांवर डोळा ठेवून पवार पगड्या बदलतात...

बहुजन मतांवर डोळा ठेवून पवार पगड्या बदलतात...

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 1:07AM



पुणे : प्रतिनिधी

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी आमचे सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, बहुजन समाजाच्या मतांवर डोळा ठेवून पगड्या बदलणार्‍या पवारांनी राज्य सरकारला पाठवलेल्या राजकीय पत्राला उत्तर देण्याची गरज नाही, असा टोला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लगावला.

सिम्बॉयोसिसच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या तिसर्‍या पदवीप्रदान सोहळ्यासाठी पुण्यात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील 1300 शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारचा सर्वात वाईट असल्याची टीका करत, याबाबत सरकारला पत्र पाठविले होते. त्यावर अद्याप कोणतेही उत्तर आले नसल्याचेही शरद पवार यांनी म्हटले होते. त्यावर बोलताना विनोद तावडे यांनी ही टीका केली. तावडे म्हणाले की, शरद पवार यांच्यासारखी अभ्यासू माणसे निवडणूक आली की पॉलिटिकल बोलत असतात. तसेच जो पत्रव्यवहार राजकीय असतो त्याला उत्तर देण्याची गरज नसते, असेही विनोद तावडे यावेळी म्हणाले.

साहित्य महामंडळाचा निर्णय स्वागतार्ह

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता बंद झाली, ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. सांस्कृतिक मंत्री म्हणून राज्याच्या 11 कोटी जनतेच्या वतीने मी साहित्य महामंडळाचे अभिनंदन करतो. आता निवडणूक नाही, तर निवड होईल. त्यामुळे साहित्य संमेलन कोणत्याही वादाविना पार पडेल. त्यामुळे खर्‍या साहित्याचा आनंद घेता येईल, असेही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.