Thu, Apr 25, 2019 04:09होमपेज › Pune › नवस फेडला,पण काळाने डाव साधला

नवस फेडला,पण काळाने डाव साधला

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 12:03AMपुणे : प्रतिनिधी

मुलगा झाला....त्याचे नाव ठेवले.... गणपतीवरील नितांत श्रद्धेपोटी मुलासाठी नवस बोलला होता.... त्याचा गणपतीला बोललेला नवस फेडण्यासाठी प्रजासत्ताकदिनाची सुट्टी साधून कुटुंबीय गणपतीपुळे येथे गेले. मात्र नवस फेडल्यानंतर अख्यख्या कुटुंबावरच काळाने घाला घातला. अन् पुण्यातील केदारी, वरखडे व नांगरे या नातेवाईक कुटुंबातील बारा जणांसह चालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना शुक्रवारी रात्री कोल्हापूर येथे घडली. शोकाकुल वातावरणात शनिवारी सायंकाळी तीनही कुटुंबांतील बारा जणांवर अंत्यसंस्कार केले. 

केदारी कुटुंबीय पुण्यातील बालेवाडी परिसरात राहतात. या कुटुंबातील भरत केदारी व मंदा केदारी यांची मुले सचिन केदारी व दिलीप केदारी, मनीषा वरखडे आणि छाया नांगरे टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करत होता. त्याची वाहने वेगवेगळ्या कंपन्यांना सेवा देतात; तर मनीषा वरखडे व त्यांचे कुटुंब पिरंगुट येथे राहतात. छाया नांगरे या बालेवाडीतच केदारी कुटुंबीयांसोबत राहण्यास आहेत. 

सचिन याच्या मुलाच्या जन्माचा नवस फेडण्यासाठी सचिन केदारी, त्याची पत्नी, मुले, त्याची आई, दोन बहिणी आणि त्यांची मुले अशा सोळा जणांनी गणपतीपुळे येथे जाण्याचे नियोजन केले. सचिनकडे लहान वाहने असल्याने त्यात एवढी माणसं बसणार नाहीत म्हणून त्यांनी डोणजे येथील साई टूर्सची टेम्पो ट्रॅव्हलर भाड्याने नेली. गुरुवारी रात्री ते पुण्याहून गणपतीपुळे येथे जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान शुक्रवारी गणपतीपुळे येथे दर्शन घेऊन कुटुंबीय कोल्हापुरात आले.

मात्र कोल्हापूर येथील पंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या कठड्याला धडकून टेम्पो ट्रॅव्हलर रात्री नदीत कोसळली. यात ज्याचा नवस फेडण्यासाठी कुटुंब गेले होते त्या सानिध्यसह बारा जणांचा आणि चालकाचा करुण अंत झाला. कुटुंबातील दिलीप केदारी, त्यांचे वडील भरत केदारी व छाया नांगरे यांचे पती दिनेश नांगरे काही कामामुळे त्यांच्यासोबत गेले नव्हते. मात्र त्यांना मोठ्ठा मानसिक धक्का बसला.  शनिवारी सायंकाळी त्यांचे मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.