होमपेज › Pune › जांबेला रंगले बैलगाडीतील कविसंमेलन

जांबेला रंगले बैलगाडीतील कविसंमेलन

Published On: Jan 21 2018 2:53AM | Last Updated: Jan 20 2018 10:57PMपिंपरी : प्रतिनिधी

माती आणि माता यात फक्त एका वेलांटीचाच फरक असतो. मातेच्या गर्भातून प्रत्येक जण मातीच्याच गर्भात जात असतो; तसेच शेतकरी मातीची मशागत करतो, तर कवी मनाची मशागत करतो, या शब्दरचनांनी शेतकरी आणि कवी यांच्यातील साधर्म्य ज्येष्ठ कवी अनिल दीक्षित यांनी उलगडून दाखवले. 

निमित्त होते शब्दधन काव्यमंच आयोजित ‘जिवा शिवाची बैलजोड, कविता सांगतेय थोडं,’ या कविसंमेलनाचे. मुळशी तालुक्यातील जांबे या गावी चालत्या बैलगाडीत बसून कविता सादरीकरणाचा अनोखा प्रयोग करण्यात आला. या वेळी जांबचे सरपंच अंकुश गायकवाड, उपसरपंच रंजना गायकवाड, विलासराव देंडगे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. शब्दधनचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कविसंमेलनाची सुरुवात सजवलेल्या बैलांची सुवासिनींनी औक्षण करून करण्यात  आले. त्यानंतर बैलगाडीतून गावात फेरफटका मारत कविसंमेलन सुरू झाले.

शब्दधनचे अध्यक्ष व जेष्ठ कवी सुरेश कंक यांनी ‘बाजार मालाला द्या हो, ऋण काढू किती,’, दिनेश भोसले यांनी ‘जरी घाम गाळून पिकावेत मोती, तरी मोल कवडीसवे पाहतो मी,’ अशी शेतकर्‍यांची व्यथा मांडली. ‘किती सुंदर जांब्याचे गाव, लई आलाय आंब्याला भाव,’ असे जांबे गावाचे शब्दचित्र आय. के. शेख यांनी रेखाटले. सविता इंगळे यांनी ‘काळ्या मातीत दडल्या, सोन्याचांदीच्या खाणी, दोघे मिळून गाऊ चला, शेतामंदी गाणी,’ या शब्दांत कारभार्‍याकडे लाडीक मागणी केली. ‘नको करू आत्महत्या विनविते मी भगिनी,’ या शब्दांत बळीराजाला माधुरी विधाटे यांनी साद घातली. 

या वेळी नंदकुमार मुरडे, शोेभा जोशी, सुहास घुमरे,  कैलास भैरट, संगीता झिंझुरके, राधा वाघमारे, मधुश्री ओव्हाळ, भाऊसाहेब गायकवाड, मानसी चिटणीस, शरद शेजवळ, बाळासाहेब घस्ते यांनी आपल्या कवितांतून बळीराजाच्या समस्यांचा वेध घेतला. या वेळी विविध घोषवाक्ये बैलगाडीवर लावून जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन अरुण परदेशी, विजय चौधरी, मुरलीधर दळवी, उमेश सणस, श्यामराव साळुंके आदींनी केले. प्रदीप गांधलीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आभार वैशाली चौधरी यांनी मानले.