Tue, Jan 22, 2019 07:42होमपेज › Pune › कात्रजच्या तरुणाची आत्महत्या, की ‘ब्ल्यू व्हेल गेम’चा बळी?

कात्रजच्या तरुणाची आत्महत्या, की ‘ब्ल्यू व्हेल गेम’चा बळी?

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 16 2018 1:35AMपुणे : प्रतिनिधी 

युसूफ याकूब शेख (24, रा़  संतोषनगर, कात्रज) या तरुणाने आत्महत्या केल्याचे बोलले जात असले तरी, ‘ब्ल्यू व्हेल गेम’ने त्याचा बळी घेतला काय, असा संशय व्यक्त होत आहे. त्याच्या पायावर धारदार वस्तूच्या जखमा आढळल्या. त्याला मोबाईलवर गेम खेळण्याचा छंद होता. त्याच्याकडील चार मोबाईल्सचे लॉक उघडल्यानंतर उलगडा होईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

युसूफ शेख याचे वडील भंगार खरेदीचा व्यवसाय करतात. त्यांची कोंढवा, कात्रज, संतोषनगर येथे 4 दुकाने आहेत. युसूफचा विवाह ठरला होता. शनिवारी रात्री तो आपल्या खोलीमध्ये गेला. दररोज उशिरा उठणारा युसूफ रविवारी दुपार झाली तरी न उठल्याने खोलीचा दरवाजा ठोठावला गेला. प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबियांनी पत्र्याचा दरवाजा वाकवून पाहिले असता त्याने गळफास घेतल्याचे आढळून आले़   त्यांनी भारती विद्यापीठ पोलिसांना कळविले़  युसूफला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद होता. तो गेल्या काही दिवसांपासून निराश वाटत होता, असे त्याच्या काही नातेवाईकांनी सांगितले. 

त्यावेळी अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधीसाठी नातेवाईक गेल्याने माहिती मिळू शकली नाही. युसूफच्या उजव्या पायावर जखमांच्या खुणा आढळून आल्या. त्या कंपासमधील कर्कट्कसारख्या वस्तूच्या असाव्यात.  मात्र, या जखमा जुन्या होत्या. त्याच्याकडील चारही मोबाईल ताब्यात घेतले आहेत, ते लॉक आहेत, असे पोलिस उपनिरीक्षक अहिवळे यांनी सांगितले. ‘ब्ल्यू व्हेल’ खेळताना आत्महत्येच्या घटना ताज्या आहेत़  अनेक जण टास्क पूर्ण करण्यासाठी शरीरावर जखमा करून घेतात. असा हा प्रकार आहे का, याचा शोध सुरू आहे.