Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Pune › कात्रज-नवले ब्रीज रस्ता समस्याग्रस्त

कात्रज-नवले ब्रीज रस्ता समस्याग्रस्त

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 04 2017 11:19PM

बुकमार्क करा

कात्रज : महेंद्र संचेती

कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर कात्रज ते नवले पूल हा रस्ता समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. या मार्गावर सेवा रस्त्यांचा अभाव, सर्वत्र अनधिकृत फ्लेक्स, जड वाहनांचे अनधिकृत पार्किंग, कचर्‍याचे ढीग, तुटलेले दुभाजक, खड्ड्यांची मालिका, बंद पथदिवे अशा मोठ्या समस्या आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत अपघात होत असतात. मात्र राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण व महापालिका प्रशासनाला या गंभीर विषयाबाबत सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र आहे.

महामार्ग प्राधिकरणाने हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केला आहे. या विभागाकडून पालिका प्रशासनाकडे रस्ता हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्राधिकरणाकडे निधीची तरतूद नसल्यामुळे महापालिकेने या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करावी, असे पत्र पालिका आयुक्तांना दिले आहे. कात्रज चौक ते नवले पुलापर्यंत या बाह्यवळण महामार्गावर दत्तनगर चौकाशेजारी दुभाजक तुटलेला आहे.

कात्रज चौक ते अभिनव स्कूलपर्यंत एका बाजुने सेवा रस्ता असून तो खड्डे, पथदिवे, कचरा अशा समस्यांनी जखडलेला आहे. तसेच या सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे जड वाहने पार्क केली जातात. रात्रीच्या वेळी या वाहनांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

कात्रज ते नवले पुल या बाह्यवळण महामार्गाच्या दुसर्‍या बाजुस सेवा रस्ता नाही. तसेच तेथे चार मोठी मंगल कार्यालये आहेत. लग्नसराईत वाहने या बाजुच्या रस्त्यावरच पार्क केली जातात. तसेच कुरघोड्यांमुळे व फटाक्यामुंळे वाहतूक कोंडी होत असते. आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ, शिवसृष्टी भागात मोठी लोकवस्ती वाढली असून, या भागातील नागरिकांना दत्तनगर किंवा इंदू लॉन्स समोरील भुयारी मार्गाला वळसा घालून यावे लागत आहे. या महामार्ग इतर दोन मुख्य महामार्गाना जोडणारा मार्ग असल्यामुळे जड व इतर वाहनांची मोठी वर्दळ त्यावर असते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून सेवा रस्ता बनविण्याच्या कामाचे घोंगडे भिजत आहे. 

पालिका हद्दीतून जाणारा हा मुख्य रस्ता असून, हद्दीलगतच्या आंबेगाव बुद्रूक आंबेगाव खुर्द, जांभुळवाडी, कोळेवाडी या गावांतील नागरिकांना हा रस्ता ओलांडून जावे लागते. दत्तनगर येथे भुयारी मार्ग आहे. मात्र तो वाहतुकीस कमी पडतो. त्यामुळे बेलदरे पेट्रोलपंप ते भुयारी मार्ग व्हावा तसेच कात्रज ते नवले पुलापर्यंतचे सेवा रस्ते तत्काळ विकसित करावेत. बाह्यवळण महामार्गावर आंबेगाव बुद्रुकच्या भुयारी पुलावर मोठे फ्लेक्स लावण्यात आल्याने अपघाताचा धोका अधिकच बळावला आहे. या फ्लेक्सची अर्धी बाजू महामार्गावरच आली आहे. त्यामुळे जास्त उंचीच्या जड वाहनांना अंदाज येत नसल्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. या अपघाताला नियंत्रण देणार्‍या फ्लेक्सला परवानगी कोणी दिली त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असे प्रश्‍न अनुत्तरितच आहेत.