Thu, Jun 20, 2019 01:49होमपेज › Pune › कर्नाटकने खाल्‍ला रत्नागिरीचा ‘भाव’

कर्नाटकने खाल्‍ला रत्नागिरीचा ‘भाव’

Published On: May 28 2018 1:38AM | Last Updated: May 27 2018 11:44PMपुणे : प्रतिनिधी

कर्नाटक राज्यामध्ये झालेल्या पावसामुळे तेथील शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात आंबे विक्रीसाठी बाजारात आणले आहेत. त्यामुळे कर्नाटक आंब्याचे दर उतरले असून त्याचा फटका मात्र, रत्नागिरीच्या आंब्यांना बसला आहे. त्यातच रत्नागिरी आंब्याचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आला असून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच आंबे बाजारात येणार असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. 

गुलटेकडी मार्केट यार्ड येथील फळ विभागात कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणावर आंब्याची आवक झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे दर निम्म्याने खाली आले असून त्याचा मोठा फटका रत्नागिरीच्या शेतकर्‍यांना बसला आहे. बाजारात कर्नाटकला असलेल्या बाजारभावाप्रमाणे रत्नागिरीचा आंबाही उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा ग्राहकांची असली तरी दोन्ही आंब्यांमध्ये फरक असल्याने कर्नाटक आंब्याचा बाजारभाव रत्नागिरीला लागू होऊ शकत नसल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.

बाजारात रविवारी कर्नाटक आंब्याची दोन डझनाच्या तब्बल 30 हजार पेटी तर रत्नागिरीची तब्बल 4 हजार पेटींची आवक झाली आहे. बाजारात आलेल्या कर्नाटक आंब्यांमध्ये एक किलोच्या लालबागला 15 ते 25 रुपये, बदामला 20 ते 25 रुपये, मल्‍लिकाला 20 ते 25 रुपये, केशरला 25 ते 45 रुपये, पायरीच्या 4 डझनला 300 ते 400 रुपये तर हापूसच्या 4 डझनला 400 ते 600 रुपये दर मिळाला आहे. याउलट रत्नागिरीच्या कच्च्या हापूसला 4 ते 8 हजार रुपये तर तयार हापूसला 7 ते 1200 रुपये दर मिळाला.

रत्नागिरीचा तयार हापूस 200 ते 600 रुपये एका डझनामध्ये ग्राहकांपर्यंत उपलब्ध होत आहे. आगामी काळात रत्नागिरीचा आंबा अंतिम टप्प्यात आला असून दि. 10 जूनपर्यंतच रत्नागिरी बाजारात उपलब्ध होऊ शकतो. मागणी नसल्यानेच रत्नागिरी हापूसला योग्य बाजारभाव मिळत नसल्याचे मोरे यांनी सांगितले.

हापूसची मागणी घटतेय : मनीष शिंदे

याबाबत बोलताना आंब्याचे व्यापारी मनीष शिंदे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत रत्नागिरी हापूसला मागणी घटत चालली असून त्यामुळे 200 ते 600 रुपयांपर्यंत प्रत्येकी डझनाला दर मिळत आहेत. आंबा शेवटच्या टप्प्यात असून ग्राहकांकडूनही मागणी कमी झाली आहे. काही दिवसांवरच शाळा सुरू होणार असल्याने शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची लगबग सुरु झाली. त्यामुळे आंब्याला मागणी ही कमी झाली आहे.