Sat, Apr 20, 2019 18:19होमपेज › Pune › कन्नड भाषेने पुणेकरांना लावियला वेधू!

कन्नड भाषेने पुणेकरांना लावियला वेधू!

Published On: Jul 10 2018 1:03AM | Last Updated: Jul 10 2018 1:03AMपुणे : किरण जोशी

महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवरून विस्तवही जात नसताना विद्येच्या माहेरघरात मात्र मराठी आणि कन्नड भाषांचा अनुबंध विणला जात आहे. मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्राच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक पुणेकरांनी कन्नडचे धडे गिरवले आहेत.  बंगळुरुमधील आयटी कंपनीतील संवाद अधिक सुलभ होण्यासाठी, कन्नड साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी कन्नड भाषेशी गट्टी केली आहे.

वास्तविक दोन्ही राज्यांमध्ये सीमेचा वाद असला तरी अजूनही महाराष्ट्रात 450हून अधिक कन्नड शाळा आहेत. यातील शंभराहून अधिक शाळा कर्नाटक सीमेलगत असणार्‍या सांगली जिल्ह्यात आहेत. येथील शिक्षण कन्नड भाषेत असले तरी मराठी विषयही सक्तीचा आहे. त्याचप्रमाणे कन्नड शिकण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी अभ्यास वर्ग चालविले जात आहेत. बालभारतीतून विशेष अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले कृष्णा हेगडे आणि त्यांच्या सहकार्‍यांकडून पुण्यात स्नेहवर्धन केंद्र चालविले जात आहे.  याबद्दल सांगताना हेगडे म्हणाले, मराठीतील अनेक शब्दांना कन्नड भाषेची छटा आहे.  अक्का, अप्पा हे शब्द कन्नड भाषेतून मराठीत उतरले आहेत. अडकित्ता हा कन्नड शब्द सर्रास मराठी भाषिकांकडून उच्चारला जातो. अड म्हणजे अडकविणे आणि कित्ता म्हणजे कापणे. तसेच पाणी तुंबले यामध्येही कन्नड छटा आहे. तुंबू या मूळ कन्नड शब्दाचा अर्थ आहे तुंबणे.

केंद्राकडून दरवर्षी लेखी आणि तोंडी 

अशी 200 गुणांची परीक्षा घेतली जाते.  आजपर्यंत दोन हजारांहून अधिक तरुण, ज्येष्ठांनी ही परीक्षा दिली असून, दीड हजार जण उत्तीर्ण झाले आहेत. बंगळुरूमधील स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी म्हणून आयटी कंपनीतील तरुण कन्नड शिकत आहेत. 

राजकारणासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाला खतपाणी घातले जात आहे. इंग्रजी भाषेकडे वाढलेला ओढा लक्षात घेता आता दोन्ही भाषांसमोर अस्तित्वाचे आव्हान आहे. त्यामुळे हा तंटा मिटून दोन्ही भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.-  कृष्णा हेगडे, मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्रचालक

आई कानडी भाषिक असल्याने लहानपणापासून ही भाषा कानावर पडत होती. त्यामुळे ओढ म्हणून कन्नड भाषेचे ज्ञान घेतले. आता मी कन्नड  लिहू आणि वाचू शकते; पण बोलण्याचा सराव नाही. आता कर्नाटकात गेल्यावर मी थोडाफार संवाद साधू शकते. शिवाय तेथील दुकाने, प्रवासी गाड्यांवरील फलक वाचू शकते. कन्नड साहित्य समृद्ध असल्याने यापुढे भरपूर वाचन करण्याचा मानस आहे.- आदिती संगोराम