Thu, Apr 18, 2019 16:28होमपेज › Pune › विश्वविक्रमीकामी रिटा शेर्पा येणार पुण्यात

विश्वविक्रमीकामी रिटा शेर्पा येणार पुण्यात

Published On: Jul 12 2018 1:43AM | Last Updated: Jul 12 2018 12:14AMपुणे : प्रतिनिधी

भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था ‘गिरिप्रेमी’ नियोजित ‘कांचनगंगा इको एक्स्पेडिशन 2019’ च्या निमिताने आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमाला सर्वाधिक 22 वेळा ‘एव्हरेस्ट’ चढाई करणारे कामी रिटा शेर्पा येत्या 17 जुलै रोजी पुण्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. 

हा कार्यक्रम कन्नड संघ सभागृह, डॉ. कलमाडी शामराव प्रशाला येथे मंगळवार, दि. 17 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. सर्व 14 अष्टहजारी शिखरांवर चढाई केलेले नेपाळचे पहिले मिंग्मा शेर्पा, एव्हरेस्ट शिखरवीर व दार्जिलिंग येथील हिमालयन माउंटनियरिंग इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य देविदत्ता पांडा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सहा वर्षांमध्ये 14 पैकी 6 अष्टहजारी शिखरांवरील यशस्वी मोहिमांनंतर ‘गिरिप्रेमी’ आता भारतातील सर्वात उंच शिखर ‘माउंट कांचनगंगा’वर महाराष्ट्रातील सर्वात मोठी नागरी मोहीम घेऊन जाणार आहे. 

ज्येेष्ठ गिर्यारोहक, एव्हरेस्टवीर व एडमंड हिलरी यांच्या साथीने ‘माउंट एव्हरेस्ट’वर प्रथम चढाई करणारे शेर्पा तेनझिंग नोर्गे यांचे सुपुत्र जामलिंग नोर्गे यांच्या उपस्थितीत मोहिमेची घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष मोहीम 2019 सालामध्ये जाणार आहे, त्या निमित्ताने वर्षभर अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून याच शृंखलेचा एक भाग म्हणून हा विशेष कार्यक्रम घेण्यात येत आहे.

कांचनगंगा इको एक्स्पेडिशन 2109 च्या निमित्ताने कांचनगंगा शिखराचा व तसेच मोहिमेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यातील हा कार्यक्रम विशेष असणार आहे. जगामध्ये सर्वाधिक 22 वेळा एव्हरेस्ट चढाई करणारे कामी रिटा शेर्पा आवर्जून पुण्यात उपस्थित राहणार आहेत. तसेच पुण्याच्या महापौर मुक्त टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलुगुरू नितीन करमळकर, एमसीसीआयए संचालक मंडळाचे प्रमुख डॉ. अनंत सरदेशमुख, श्री साई संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून राहतील. या मोहिमेची इको प्रोजेक्ट टीम ‘कांचनगंगा जैवविविधता परिसरा’मधील निसर्ग संपन्नतेचा व जैवविविधतेचा अभ्यास करणार आहे. या मोहिमेच्या निमित्ताने भारतातील कांचनगंगा शिखराचा देखील प्रसार व प्रचार करण्याचा मानस आहे.