Wed, Sep 18, 2019 10:36होमपेज › Pune › बर्निंग बसमध्ये पुण्यातील दोघांचा होरपळून मृत्यू

बर्निंग बसमध्ये पुण्यातील दोघांचा होरपळून मृत्यू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कळे : वार्ताहर

मडगाव (गोवा) येथून कोल्हापूरमार्गे बोरिवली-मुंबईकडे निघालेली खासगी आरामबस  कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावर लोंघे (ता. गगनबावडा) गावाजवळ आल्यावर अचानक लागलेल्या आगीत खाक झाली. या आगीमध्ये होरपळून बंटीराज भट (रा. रोशनपुरा, मध्य प्रदेश) व विकी मदन भट (रा. हडपसर, इंदिरानगर, पुणे) या दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 24) पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास घडली.

चालक शहाबाज अहमद रखांगी (वय 25, रा. बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) व मनोज मांजरेकर (रा. म्हापसा, ता. पणजी) हे दोघे  मॅसकोट-आत्माराम ट्रॅव्हल्सची आरामबस घेऊन रात्री 8.30 च्या सुमारास मडगावहून बोरिवलीकडे निघाले होते. ट्रॅव्हल्समध्ये एकूण 18 प्रवासी होते. पहाटे अडीच ते तीनच्या सुमारास कोल्हापूर-गगनबावडा राज्य मार्गावरील लोंघेजवळच्या मारुती मंदिरासमोर आल्यावर बसची लाईट चालू-बंद होत असल्याचे चालक शहाबाज रखांगी याच्या लक्षात आले. 

चालकाने ताबडतोब बस रस्त्याकडेला घेतली व बसचा स्वीच बंद केला. बसमधून धूर यायला लागल्यावर प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली; पण शेवटच्या बाकावरील बंटीराज भट व विकी भट या दोघांना बाहेर काढण्याआधीच बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, या रस्त्यावर ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर  चालकांनी प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली. तिसंगीचे सरपंच बंकट थोडगे व परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली. पहाटे शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, गगनबावडा पो. नि. संदीप भागवत, कळे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश देसाई यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग विझविण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेचे दोन अग्‍निशमन बंब घटनास्थळी दाखल होते.

बसमधील किरकोळ जखमी झालेल्या सुजाता रमेश नाथनकर (71), तेजस्विनी रवींद्र नाथनकर (54, दोघीही रा. रत्नागिरी), दीपाली श्रीकांत राणे (32), श्रीकांत नंदकिशोर राणे (35, रा. पुणे) या चौघा प्रवाशांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कळे येथे हलविण्यात आले. या घटनेची नोंद गगनबावडा पोलिसांत झाली आहे.
 
WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex