Sun, Nov 18, 2018 00:59



होमपेज › Pune › कळसकरच दाभोलकरांचा शूटर

कळसकरच दाभोलकरांचा शूटर

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:16AM



पुणे : प्रतिनिधी 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपी शरद कळसकरला नालासोपारा येथील गुन्ह्यातून वर्ग करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर कळसकर हा शस्त्र हाताळण्यात तरबेज; तसेच बॉम्ब बनविण्यात पारंगत असून, त्यानेच डॉ. दाभोलकर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याचा दावा सीबीआयच्या वकिलांनी मंगळवारी न्यायालयात केला. 

त्याच्याकडे अधिक तपास करण्यासाठी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम. एस. ए. सय्यद यांनी त्याला 10 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. शरद कळसकरला मंगळवारी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी त्याला पोलिसांविरोधात काय तक्रार आहे का? अशी विचारणा केल्यानंतर त्याने नाही, असे सांगितले. सीबीआयचे वकील विजयकुमार ढाकणे यांनी युक्‍तिवादात सांगितले की, 23 ऑगस्ट रोजी सीबीआयने कळसकरबाबत प्रॉडक्शन वॉरंट घेऊन त्याचा ताबा सोमवारी घेतला. 

सीबीआयने न्यायालयात सांगितले की, कळसकरचा कटातील सहभाग निष्पन्‍न झाला असून, त्याने डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्या मदतीने कट रचला असल्याचे तपासात समोर आले आहे. अशा विविध मुद्द्यांवर कळसकरकडे तपास करण्यासाठी त्याला 14 दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी अ‍ॅड. ढाकणे यांनी केली.  

महाराष्ट्र एटीएसने नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणात तपास सुरू केल्यानंतर दाभोलकर हत्येसंदर्भात माहिती समोर आली. त्याआधारे सीबीआयने सचिन अंदुरेला अटक केली. त्याची चौकशी केली असता शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकरचा दाभोलकर यांच्या हत्येशी संबंध असल्याचे समोर आले होते. कळसकर हा डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी असल्याचेही सीबीआयने न्यायालयात सांगितले. 

बचाव पक्षाचे वकील धर्मराज चंडेल यांनी प्रतिवाद करताना सांगितले की, डॉ. दाभोलकर प्रकरणात सचिन अंदुरे याच्या मेहुण्याच्या मित्राच्या घरातून एक पिस्तूल व तीन काडतुसे 20 ऑगस्ट रोजी जप्‍त करण्यात येऊन, त्याबाबत औरंगाबाद येथे आर्म्स अ‍ॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पिस्तूल हे डॉ. दाभोलकर प्रकरणात वापरल्याचे 26 ऑगस्ट रोजी तपास यंत्रणांनी सांगितले आहे. मात्र, त्या पिस्तुलाचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. याप्रकरणी सीबीआयने अटक केलेला सचिन अंदुरे याची 14 दिवस सीबीआय कोठडी घेऊनही गुन्ह्यात वापरलेले शस्त्र अथवा मोटारसायकल जप्‍त करण्यात आलेली नाही. अंदुरे याला घटनास्थळावर नेऊन नवीन थेअरी मांडण्याचा प्रयत्न सीबीआय करत आहे. मात्र, सीबीआयने ऑगस्ट 2016 मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून, डॉ. दाभोलकर यांची हत्या सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी केल्याचे नमूद केले असून, अंदुरे, कळसकर यांना विनाकारण गोवले जात असल्याने त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्‍तिवाद ऐकून कळसकरला पोलिस कोठडी सुनावली.