Mon, May 20, 2019 22:54होमपेज › Pune › काकडेंनी आधी निवडणूक लढवावी : विजय शिवतारे

काकडेंनी आधी निवडणूक लढवावी : विजय शिवतारे

Published On: Jan 28 2018 1:37AM | Last Updated: Jan 28 2018 1:11AMपुणे : प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा निवडणुका स्वतंत्रपणे लढविण्याची घोषणा केली. या घोषणेची राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी खिल्ली उडवली होती. शिवसेनेने लोकसभेच्या निवडणुका स्वतंत्र लढविल्यास पाचसुद्धा खासदार निवडून येणार नसल्याचे सांगितले होते. खा. काकडे यांच्या या वक्तव्याचा जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी समाचार घेताना खा. काकडेंनी आधी लोकांत जाऊन निवडणूक लढवून जिंकून यावे, मगच शिवसेनेला सल्ला द्यावा, असा टोला लगावला. 

राज्यमंत्री शिवतारे म्हणाले की, गुजरात निवडणुकीवेळी काकडे यांनी भाजप जिंकून येणार नसल्याची भविष्यवाणी केली होती. तरीही तेथे भाजपच सत्तेवर आले आहे. अशी वक्तव्ये करून ते चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले. काकडे हे अपक्ष म्हणून राज्यसभेवर गेले असून, भाजपची सत्ता येताच त्यांनी सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. मात्र, उलट-सुलट वक्तव्ये करून ते भाजपलाच अडचणीत आणत आहेत. 

मागच्या लोकभेला मी बारामतीमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक होतो, तशी तयारीही केली होती. मात्र, युतीमध्ये ती जागा भाजपला गेली. भाजपच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी लढविली. या निवडणुकीत शिवसेना-भाजपने जानकर यांच्या विजयासाठी जीवाचे रान केले. मात्र, थोडक्या मतांनी जानकरांचा पराभव झाला. सध्या मी राज्यात मंत्री असून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा माझा काही विचार नाही. मात्र, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  शिवतारे यांनी सांगितले.