होमपेज › Pune › पुणे : विदेशी गुन्हेगारांनी  घेतला ‘लेडी सिंघम’चा धसका

पुणे : विदेशी गुन्हेगारांनी  घेतला ‘लेडी सिंघम’चा धसका

Published On: Dec 05 2017 1:45AM | Last Updated: Dec 05 2017 1:45AM

बुकमार्क करा

पुणे : देवेंद्र जैन 

सर्वसामान्यांत स्वत:ची लेडी सिंघम अशी ओळख निर्माण केलेल्या व सध्या परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाच्या पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत असलेल्या ज्योतीप्रिया सिंग यांनी बेकायदेशीर वास्तव्य करून गुन्हे करणार्‍या परकीय नागरिकांच्या विरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यास कारणीभूत ठरणार्‍या अनेकांना त्यांनी काळ्या यादीत टाकून  मायदेशी हाकलले आहे.  गुन्हेगारांसाठी लेडी सिंघम कर्दनकाळ ठरत असल्याने बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या विदेशी नागरिकांनी  त्यांचा चांगलाच धसका घेतला आहे. 

लेडी सिंघम ज्योतीप्रिया सिंग यांची पुणे शहरात मे 2017 मध्ये पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाल्यानंतर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्याकडे परकीय नागरिक नोंदणी कार्यालयाचा पदभार सोपवला. हाती आलेले प्रत्येक काम फत्ते करायचे, अशी त्यांच्या कामाची पद्धत असल्याने या कार्यालयाचाही काही दिवसांत कायापालट झाला. त्यामुळे पुण्यातील परकीय नोंदणी कार्यालय आणि तेेथील कर्मचार्‍यांकडून मिळणारी आदरयुक्त वागणूक यामुळे परदेशी नागरिकही सुखावले आहेत, हे कार्यालयाला प्राप्त झालेल्या अनेक विदेशी नागरिकांच्या पत्रांवरून दिसून आले आहे. 

काही दिवसांपूर्वी सिंग यांनी कोंढवा येथील शालिमार सोसायटीत टाकलेल्या छाप्यात कांगो देशातील दोन आणि लीबियातील एका नागरिकाला मायदेशी हकालण्याची कारवाई केली आहे.  तिघेही आरोपी अधिवास परवान्याची मुदत संपल्यानंतरही पुण्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करत असल्याचे तपासात आढळून आले आहे.  त्यामुळे त्यांना नजरकैदेत ठेवून संबंधित देशाच्या दूतावासाला कळवण्यात आल्याचे ज्योतीप्रिया सिंग यांनी सांगितले. या त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे पुणे शहरात बेकायदेशीरपणे राहण्यार्‍या परकीय नागरिकांनी धसका घेतला आहे.  

कामाची पद्धत बघितल्यानंतर अनेकांनी तोंडात बोटे घातली. हे परदेशी नागरिक नोंदणी कार्यालय सिंग यांच्यासाठी नवीन असल्याने त्यांनी सुरुवातीच्या महिन्यात कार्यालयाच्या कामकाजाचा अभ्यास केला आणि त्यानंतर वेगाने काम सुरू केले. परकीय नागरिक कार्यालाच्या मागील काही वर्षांच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की, 2015 साली एकूण 50,  2016 साली 95 परदेशी नागरिकांना काळ्या सूचीत टाकण्यात आले होते, तर नोव्हेंबर 2017 अखेर 138 नागरिक काळ्या सूचीत गेले आहेत. परवान्याच्या मुदतीपेक्षा जास्त काळ वास्तव्य करणे, गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणे, महाविद्यालयात गैरहजर राहणे, अशा अनेक कारणांची पडताळणी केल्यानंतर संबंधित नागरिकाला काळ्या सूचीत टाकण्यात येते.

भारतीय न्यायव्यवस्थेचा फायदा घेऊन काही नागरिक त्यांचा व्हिसा  वाढवतात व  नेहमी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करतात. त्यामुळे आता कुठल्याही परकीय नागरिकाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केल्यास स्थानिक पोलिस ठाण्यातून त्याचा वर्तणूक अहवाल संबंधित पोलिस उपायुक्तांना पाठवण्यात येतो व सदर अहवाल परदेशी नागरिक नोंदणी कार्यालयात सादर करण्यात येतो व त्या कार्यालयातून  लगेच संबंधित देशाच्या दूतावासाला कळवले जाते.  त्यानंतर सदर नागरिकाकडून अधिक काळ रहिवास शुल्क वसूल केले जाते व त्यानंतर त्याची त्याच्या देशात रवानगी होते, असे सिंग यांनी सांगितले. ज्योतीप्रिया सिंग यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले त्या ठिकारी त्यांची ओळख लेडी सिंघम  म्हणून झाली. त्यांच्या कामाचा अवाका पाहून गुंडांची पळताभुई थोडी झाली. त्यांची कारकीर्द नेहमी प्रशंसनीय राहिली. सामान्य माणूस त्यांच्याकडे अन्यायाची कुठलीही तक्रार घेऊन गेला की त्या तक्रारदाराला नक्कीच न्याय मिळवून देतात. त्यामुळे त्यांची ओळख लेडी सिंघम म्हणून झाली आहे. 

बायोमेट्रिक पद्धतीसाठी गृह खात्याने पुढाकार घ्यावा

बांगलादेशातील एका नागरिकाला दहा वर्षांपूर्वी मायदेशी हाकलले होेते. मात्र  मागील महिन्यात घरफोडीच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी अटक केली आहे. सदर आरोपीकडे तपास केल्यानंतर अनेक बाबींची उकल झाली. प्रामुख्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे नागरिक स्वत:च्या देशात जाऊन नवीन नावाने नोंदणी करून पारपत्र मिळवतात व परत भारतात येऊन बेकायदेशीर धंदे सुरू करतात.

त्याकरिता  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बायोमेट्रिक पद्धत लागू करणे गरजेचे आहे. ही पद्धत जर जागतिक स्तरावर अमलात आली तर याचा फायदा फक्त भारताला नव्हे तर संपूर्ण जगाला होईल व अतिरेकी कारवायांना आळा बसेल. त्याकरिता सुरक्षा यंत्रणा व केंद्रीय गृह खात्याने पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे ज्येष्ठ विधिज्ञ पी. डी. देशपांडे यांनी दै. पुढारी प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे.