Sat, Mar 23, 2019 16:23होमपेज › Pune › जुन्नर पर्यटन तालुका जाहीर करणार : तावडें

जुन्नर पर्यटन तालुका जाहीर करणार : तावडें

Published On: Feb 23 2018 1:24AM | Last Updated: Feb 22 2018 10:42PMजुन्नर : वार्ताहर

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे राज्यातील भाजप-शिवसेना युतीचे शासन सत्तारूढ झालेले असून, छत्रपतींनी घालून दिलेल्या आदर्श राज्य पद्धतीच्या मार्गानेच रयतेकरिता शासन करीत आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका म्हणून लवकरच घोषित करण्यात येणार असून, छत्रपतींचा इतिहास जागविण्यासाठी जुन्नरमध्ये राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने या वर्षीपासून ‘शिवनेरी महोत्सव’ सुरू करण्यात आल्याचे राज्याचे शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळ्यानिमित्ताने  शिवजन्मस्थान किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नरमध्ये आयोजित ‘शिवनेरी भूषण’ पुरस्कार प्रदान व जाहीर सभेत ते बोलत होते.  या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे,  समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे,  खासदार शिवाजीराव आढळराव पाटील,  मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार,  नगराध्यक्ष श्याम पांडे,  सभापती ललिता चव्हाण,  विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, सभापती संजय काळे,  गटनेत्या आशा बुचके,  माजी आमदार बाळासाहेब दांगट, भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान घोलप,  जुन्नर शहराध्यक्ष नंदकुमार तांबोळी आदींसह भाजपा-शिवसेनेचे पदाधिकारी,  कार्यकर्ते  व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, ऐतिहासिक जुन्नर तालुका हा राज्यातील आदर्श पर्यटन तालुका म्हणून येत्या चार-पाच दिवसांत राज्य शासनाकडून जाहीर होणार असून, आगामी काळात 2 हजार कोटींची विविध विकासकामे शासनाच्या माध्यमातून तालुक्यात होणार आहेत.