Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Pune › जुन्नर पर्यटन तालुका जाहीर 

जुन्नर पर्यटन तालुका जाहीर 

Published On: Mar 23 2018 1:59AM | Last Updated: Mar 23 2018 1:54AMलेण्याद्री : वार्ताहर

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका म्हणून घोषित करत त्याचा अधिकृत अध्यादेश बुधवारी (दि. 21) काढण्यात आला आहे. जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी राज्य शासनाकडे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. तर जुन्नर पर्यटन तालुका जाहीर झाल्याने जुन्नर तालुक्यातील नागरिक, पर्यटक व निसर्गप्रेमी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पर्यटन तालुका जाहीर झाल्याने तालुक्यातील पर्यटन क्षेत्रांच्या विकासाला भरघोस निधी मिळेल व त्याद्वारे पर्यटन क्षेत्र जगाच्या नकाशावर येईल, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. 

गेल्या अनेक महिन्यांपासून आमदार शरद सोनवणे यांनी राज्य शासनाकडे जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून जाहीर करण्यासाठी मंत्री महोदयांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्याच पार्श्वभूमीवर शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका जाहीर करत लवकरच शासकीय अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार हा अध्यादेश काढण्यात आला आहे. 

या अध्यादेशात म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यासह निसर्गसौंदर्याने नटलेले सात किल्ले, सर्वाधिक 350 लेण्या असलेला जुन्नर हा एकमेव तालुका आहे. तालुक्यात अष्टविनायकांपैकी गिरिजात्मक लेण्याद्री व विघ्नेश्वर ओझर ही दोन अष्टविनायक मंदिरे आहेत, हेमाडपंती बांधणीतील कोरीव कलाकृती असलेली तीन मंदिरे, तालुक्यात नाणेघाट, दार्याघाट, आणेघाट, आंबे हातवीज घाट असे निसर्गरम्य घाट व प्रसिद्ध धबधबे आहेत.

या क्षेत्रात नद्यांची उगमस्थाने आहेत. तसेच खोडद येथील जागतिक कीर्तीची महादुर्बिण, आर्वी येथील उपग्रह दळवळण संचार केंद्र, विविध पठारे, गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फूट खोल असलेले कोकण कडे, कुकडेश्वर येथे उगम झालेली कुकडी नदी, बोरी येथे पुरातन काळात उद्रेक झालेल्या ज्वालामुखीची राख, अनेक कृषी पर्यटन केंद्रे, नारायणगाव येथील तमाशा पंढरी, आशिया खंडातील सर्वात पहिली वायनरी, माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र, विविध प्रकारची खाद्य संस्कृती, प्राचीन परंपरा असलेल्या बाजारपेठा तालुक्यात आहेत. शासनाच्या पर्यटन धोरणाप्रमाणे जुन्नर तालुक्याला पर्यटन संवर्धनासाठी नैसर्गिकरित्या लाभलेले वैभव तसेच वैशिष्ट्य विचारात घेऊन पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या वतीने जुन्नर तालुका विशेष पर्यटन केंद्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.  दरम्यान जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित झाल्यानंतर जुन्नर येथे नागरिकांनी फटाके वाजवून व पेढे वाटून या  निर्णयाचे स्वागत केले.

सामाजिक कार्यकर्ते नीलेश चव्हाण यांनी सांगितले की, जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. आमदार शरद सोनवणे यांनी अहोरात्र मेहनत घेऊन तालुक्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांना या निर्णयाने यश मिळाले आहे. तालुक्यातील नागरिकांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा निर्णय तालुक्याचे चित्र बदलणारा ठरणार आहे. जगाच्या कानाकोपर्‍यात शिवजन्मभूमी म्हणून ओळख असलेल्या जुन्नरच्या विकासाला खर्‍या अर्थाने यामुळे पाठबळ मिळणार आहे. 

 

Tags : pune, pune news, Junnar,  Junnar Tourism Taluka, Declaration,