Wed, Nov 14, 2018 03:47होमपेज › Pune › स्कूलबस फिटनेसला २६ जूनची डेडलाईन

स्कूलबस फिटनेसला २६ जूनची डेडलाईन

Published On: Jun 19 2018 1:26AM | Last Updated: Jun 19 2018 12:45AMपुणे ः प्रतिनिधी

शालेय वाहतूक करणार्‍या स्कूल बसचालकांना पुनर्फिटनेस बंधनकारक आहे. मात्र, पुनर्फिटनेस तपासणीऐवजी बेकायदेशिररीत्या वाहतूक करणार्‍या वाहनचालकांबद्दल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) पोलिस, परिवहन आणि शालेय विभागाची संयुक्त बैठक आयोजित केली. या बैठकीत विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी येणारी वाहने, वाहनांची संख्या, वाहनचालक यांची सविस्तर माहिती मागविण्यात आली आहे. आरटीओने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट स्कूलबस सेफ्टी डॉट पुणे डॉट ओआरजी  वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. शाळांनी 26 जूनपर्यंत माहिती अपडेट करण्याची सूचना दिली आहे. 

स्कूलबसेसच्या फिटनेस तपासणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) 18 जूनची मुदत दिली होती. मात्र, शहरातील अवघ्या 1 हजार 400 वाहनांनी फिटनेस तपासणी केली होती, तर  जवळपास 2 हजार 500 वाहनांची फिटनेस तपासणी झालेली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अनफिट वाहने रस्त्यावर धावत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि. 17) आरटीओत शालेय, पोलिस आणि परिवहन विभागाच्या अधिकार्‍यांची संयुक्त बैठक पार पडली. शाळेत येणार्‍या गाड्यांची संख्या, त्यांची फिटनेस तपासणी, स्कूल बसमधील सोयी-सुविधा, गाडी-चालकासंबंधी शाळेने ठेवायची माहितीबाबत चर्चा करण्यात आली. 

शुक्रवारपासून (दि.15) शहरातील शाळांना सुरूवात झाली. अनेक शाळांतील विद्यार्थ्यांची खासगी रिक्षा आणि इतर वाहनांतून असुरक्षित वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने आरटीओकडून शिक्षण विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. 

शाळेतील विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणार्‍या खासगी गाड्यांची संख्या, चालक यांची पूर्ण माहिती प्राचार्यांकडून मागवण्यात आली आहे. येत्या 26 तारखेपर्यंत ही सगळी माहिती आरटीओकडे देण्यास सांगण्यात आले आहे. बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील, बारामती कार्यालयाचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिल वळीव, जिल्हा परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक गौतम शेवाडे, वाहतूक पोलिस निरीक्षक विजय बाजारे उपस्थित होते.