Mon, Apr 22, 2019 15:40होमपेज › Pune › भाकरी झाली स्वस्त

भाकरी झाली स्वस्त

Published On: Feb 20 2018 1:55AM | Last Updated: Feb 20 2018 1:34AMपुणे : प्रतिनिधी

गुलटेकडी मार्केट यार्डातील भुसार बाजारात नव्या ज्वारीची आवक सुरू झाली आहे. आवकेच्या तुलनेत मागणी कमी असल्याने दर प्रतिक्विंटलमागे 200 ते 300 रुपयांनी घटले आहेत. राज्यातील 5 जिल्ह्यांमधून ज्वारीची आवक होत असून, मार्चपर्यंत इतर जिल्ह्यांमधून बाजारात आवक वाढेल. मात्र, त्याचा ज्वारीच्या दरावर परिणाम होणार नसल्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नव्या ज्वारीचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारात सध्या मुबलक ज्वारी येऊ लागली आहे. सद्यःस्थितीत जामखेड, आष्टी, कडा, बार्शी, करमाळा येथून दररोज 4 ते 5 गाड्या मिळून 60 ते 70 टन गावरान व 10 ते 20 टन दुरी ज्वारी बाजारात दाखल होत आहे. गावरान ज्वारीच्या प्रतिक्विंटलला 2 हजार 700 ते 2 हजार 800 रुपये, तर दुरी ज्वारीच्या प्रतिक्विंटलला 1 हजार 600 ते 1 हजार 900 रुपये दर मिळत आहे. दुरी ज्वारी ही गावरान ज्वारीच्या तुलनेत दर्जाने हलकी व आकाराने लहान असते, तर मालाची चमक, आकार यावरून ज्वारीला दर मिळतो.

याबाबत बोलताना ज्वारीचे व्यापारी प्रवीण नहार म्हणाले, की दरवर्षी शेवगाव, अहमदनगर, जालना, जामखेड, आष्टी, कडा, बार्शी, करमाळा येथून ज्वारी बाजारात येते. यंदा राज्यभरात पाऊस चांगला झाल्याने ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. दरम्यान, शहराला मोठ्या प्रमाणात ज्वारीचा पुरवठा करणार्‍या भागातही चांगला पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होऊन चांगला दर मिळण्याची शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. मात्र, दरम्यानच्या काळात पडलेल्या थंडीमुळे दाण्यांमध्ये भराव आलेला नाही. सुरुवातीच्या काळात दाणे भरलेले असतील, मात्र नंतर ज्वारीच्या पिकासाठी पोषक वातावरण नसल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे यंदा चांगला पाऊस झाल्याने अपेक्षित उत्पन्न मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊन पडण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, मार्च महिन्यापर्यंत राज्याच्या विविध विभागातून ज्वारीची आवक वाढेल. मात्र, त्याचा दरावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

नव्या ज्वारीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी ग्राहकांकडून जुन्या ज्वारीला मागणी होत होती. त्याच्या प्रतिक्विंटलला 2 हजार ते 2 हजार 100 रुपये भाव मिळत होता. गेल्या काही वर्षांमध्ये ज्वारीला बिदर, उदगीर, हैद्राबाद, कर्नुल आदी भागातून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. परिणामी सोलापूर, जामखेड परिसरातील शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात माल त्याठिकाणी पाठविण्यात येत आहे. बहुतांश शेतकर्‍यांकडून शेतातील माल जागेवर विकण्यात येतो. त्यानंतर इतर माल शहरातील बाजारात पाठविण्यात येतो. त्यामुळे बाजारात ज्वारीच्या येण्याचे प्रमाण निम्म्याने घटल्याचेही त्यांनी नमूद केले.