Sat, Jul 20, 2019 21:19होमपेज › Pune › मानकर, कर्नाटकी यांच्यावर गुन्हा

मानकर, कर्नाटकी यांच्यावर गुन्हा

Published On: Jun 04 2018 1:30AM | Last Updated: Jun 04 2018 1:10AMपुणे : प्रतिनिधी 

सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येप्रकरणी पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक दीपक मानकर, बांधकाम व्यावसायिक सुधीर कर्नाटकी व विनोद भोळे यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगताप यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली असून, मानकर आणि त्यांच्या साथीदारांनी धमकावून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

जगताप यांचा मुलगा जयेश (28, रा. घोरपडे  पेेठ) यांनी लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. लोहमार्ग पोलिसांकडून हा गुन्हा तपासासाठी समर्थ पोलिस ठाण्याकडे  सोपविण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज खंडाळे यांनी सांगितले. जितेंद्र जगताप यांनी शनिवारी (दि. 2 जून ) घोरपडीतील लोहमार्गावर रेल्वेगाडीखाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. 

जयेश जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जितेंद्र जगताप यांच्या ताब्यातील रास्ता पेठेत समर्थ पोलिस ठाण्यासमोर असलेल्या जमिनीचा ताबा मानकर आणि कर्नाटकी यांना हवा होता. त्यामुळे जगताप यांचे मानकर व कर्नाटकी यांच्याबरोबर वाद होते. या जमिनीच्या ताब्यावरून त्यांच्यात दोन ते तीनवेळा बैठक झाली होती. जगताप यांनी या जागेचा ताबा त्यांना द्यावा तसेच कोर्‍या कागदावर सही करावी, असा दबाव मानकर आणि कर्नाटकी यांच्याकडून आणला जात होता. या जमिनीची अनेक वर्षे देखभाल केल्याचा व मेहनतीचा योग्य मोबदला दिल्यास कागदपत्रावर सही करेन, असे जगताप यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, यानंतर पुन्हा शुक्रवारी (दि. 1 जून) त्यांची बैठक झाली. जगताप यांनी या बैठकीत घडलेली हकिकत शुक्रवारी रात्री मुलगा जयेश याला सांगितली होती. मानकर, कर्नाटकी यांनी जगताप यांना  ‘या जागेचा ताबा कसा घ्यायचा, हे मला माहीत आहे. तू सही केली नाहीस तर गंभीर परिणाम  होतील,’ असे धमकावले होते.

शनिवारी (दि.2 जून) सकाळी जगताप नेहमीप्रमाणे या जागेवर गेले. त्यावेळी तेथे विनोद भोळे आणि त्याचे साथीदार आले होते. त्यांनी जगताप यांना धमकावले. तेथून जितेंद्र जगताप त्या ठिकाणाहून बाहेर पडले. आणि त्यांनी काही कामानिमित्त बाहेर जात असल्याचे मुलगा जयेशला सांगितले. त्यानंतर याच दिवशी दुपारी घोरपडीतील लोहमार्गावर आत्महत्या केली. त्यांनी एका रिक्षाचालकाकडे आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेली चिठ्ठी लखोट्यात घालून दिली होती. ती चिठ्ठी त्याने कुटुंबीयांना दिली. त्यात  मानकर, कर्नाटकी व जितेंद्र जगताप यांनी काढलेल्या छायाचित्रांतील सर्वजणांच्या त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे  लिहिले आहे, असे जयेश जगताप यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मी जबाबदार कसा ?:मानकर

दरम्यान, दीपक मानकर यांनी प्रसिद्धिपत्रकात जितेंद्र जगताप यांचा या जागेशी काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. जगताप हा माझा कार्यकर्ता होता. जागेवर देखरेख करण्यासाठी मी जितेंद्र यांना सांगितले होते. जितेंद्र माझी जागा भाड्याने देऊन यापोटी महिना 2 लाख 50 हजार रुपये कमवायचे. आपला कार्यकर्ता कमवतोय म्हणून त्याला मी कधीच विरोध केला नाही, असे मानकरांनी पत्रकात म्हटले आहे. पुढे पत्रकात म्हटले आहे की, आता ती जागा विकसित करायची आहे असे सांगताच जितेेंद्र माझ्यावर बिघडले आणि मी मरतो, आत्महत्या करतो अशी धमकी देऊ लागले. माझ्या ऑफिसवर जगताप आणि गनमॅन भाऊ शैलेश जगताप यांची बैठकसुद्धा झाली. त्यावर शैलेश म्हणाले, भाऊ मी जितूला समजावतो. तरीही जितेंद्र धमकी देत असल्याने मी पोलिस आयुक्त, साहायक आयुक्त, विश्रामबाग पोलिस ठाण्यात अर्ज केले आहेत. जर कोणी बळजबरीने पैसे मागत असेल आणि नाही दिले म्हणून ‘फस्ट्रेशन’मध्ये स्वतःचा जीव देत असेल तर मी किंवा बाकीचे  जबाबदार कसे, असा सवाल मानकर यांनी प्रसिद्धिपत्रकात केला आहे.