Tue, Apr 23, 2019 23:37होमपेज › Pune › जिजाऊंचा आज राजगडावर जन्मोत्सव सोहळा

जिजाऊंचा आज राजगडावर जन्मोत्सव सोहळा

Published On: Jan 12 2018 1:56AM | Last Updated: Jan 12 2018 12:38AM

बुकमार्क करा
वेल्हे : प्रतिनिधी

भूमिपुत्रांची परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्तता करून जगाच्या पाठीवर सर्वप्रथम मानवतावादी, लोकशाहीवादी स्वतंत्र राष्ट्र छत्रपती शिवरायांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेतून राजगडावर साकारले. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेला किल्ले राजगड राजमाता जिजाऊ यांच्या 420 व्या जन्मोत्सव सोहळ्याने शुक्रवारी (दि. 12) धन्य होणार आहे. 

अखिल भारतीय मावळा जवान संघटनेच्या वतीने राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त गडपूजन, राजगड चढणे स्पर्धा, शाहीरी पोवाडे, शिवव्याख्यान, पारंपरिक शिवकालीन खेळ, विविध क्षेत्रांतील कर्तबगारांचा सन्मान आदी कार्यक्रम आयोजित केले आहेत. राजगड महोत्सव व बारा मावळच्या वतीने रविवारी (दि. 14) मावळा मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना तोलामोलाची साथ देणारे नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती वीर बाजी पासलकर, येसाजी कंक, नेताजी पालकर, संताजी बोबडे, तुकोजी चोर, कान्होजी जेधे, शूरवीर जिवाजी महाले, हिरोजी इंदलकर आदी वीर मावळ्यांचे वंशज तसेच आमदार संग्राम थोपटे यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी, पदाधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष व इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी याबाबत माहिती दिली. 

राजगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाल बुद्रुक येथील मावळा तीर्थावरील राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकात जिजाऊंना अभिवादन करण्यात येणार आहे. राजगड, तोरणा, सिंहगड, भोर, पुरंदर, मुळशी पुणे, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणांहून हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची शासकीय पूजा वेल्हे तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्या हस्ते होऊन जन्मोत्सव सोहळ्यास प्रारंभ होणार आहे.

मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर यांचा राजमाता जिजाऊ गौरव पुरस्काराने, तर भोर येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या विश्रांती मोरे यांचा राजमाता जिजाऊ सन्मान तसेच पनवेल येथील सुधाकर लाड, बारामती येथील सुनील राजेभोसले, माऊली दारवटकर, अहमदनगर येथील भूषण वाघचौरे, कोल्हापूर येथील किरण गुरव आदी विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा पुरस्कारांनी सन्मान केला जाणार आहे, असे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब सणस व राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संग्राम राजेशिर्के यांनी सांगितले.