Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Pune › विश्‍वस्त नेमणुकीने नाराजी

विश्‍वस्त नेमणुकीने नाराजी

Published On: Dec 17 2017 2:20AM | Last Updated: Dec 17 2017 1:54AM

बुकमार्क करा

जेजुरी ः वार्ताहर 

महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाचा कारभार पाहणार्‍या श्री मार्तंड देवस्थानच्या विश्‍वस्तांच्या नेमणुका दि. 14 रोजी जाहीर झाल्या. या नेमणुकांबाबत जेजुरीत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जेजुरी शहर शिवसेना, भाजपा, समस्त ग्रामस्थ मंडळाने या निर्णयाचा निषेध केला असून, धर्मादाय आयुक्तांच्या विरोधात मंगळवारी (दि. 19) ‘जेजुरी बंद’ची हाक दिली आहे.                                 
पुणे येथील सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी पहिल्या विश्‍वस्त मंडळाची मुदत संपल्याने पाच वर्षांसाठी पुणे येथील राजकुमार लोढा, अ‍ॅड. प्रसाद शिंदे, अ‍ॅड. अशोक संकपाळ, तुषार सहाणे, जेजुरीचे संदीप जगताप, शिवराज झगडे व पंकज निकुडे यांची विश्‍वस्तपदी निवड जाहीर केली आहे. याशिवाय पुरंदरचे तहसीलदार व जेजुरीचे नगराध्यक्ष हे पदसिध्द विश्‍वस्त म्हणून कायम असतात.  
सात विश्‍वस्तांच्या जागांसाठी नोव्हेंबर महिन्यांमध्ये 256 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले होते. अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपली निवड व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र जाहीर झालेल्या नियुक्त्यांमध्ये राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप व शिवसेनेच्या एकाही कार्यकर्त्याला संधी न दिल्याने कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेण्यात आले; मात्र जाणूनबुजून जेजुरीतील कार्यकर्त्यांना वगळण्यात आल्याची कार्यकर्त्यांची तक्रार आहे.          

जेजुरी भाजपचे अध्यक्ष अशोक खोमणे, शिवसेनेचे शहरप्रमुख किरण दावलकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष गणेश आगलावे यांनी स्थानिक ग्रामस्थांना न घेता बाहेरील विश्‍वस्तांच्या नेमणुका करून जेजुरीतील ग्रामस्थांवर अन्याय करण्यात आला असून, या विरोधात तीव्र लढा उभारण्याची घोषणा केली आहे. कायदेशीर मार्गानेही न्याय मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपच्या महिला आघाडीच्या अलका शिंदे यांनी अनेक महिलांनी मुलाखती देऊनही त्यांंना विश्‍वस्त मंडळातून डावलण्याचा प्रकार अन्यायकारक आहे. शासनाचे धोरण महिलांना पन्नास टक्के आरक्षण असताना महिलांना संधी का दिली नाही यासाठी महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे सांगितले. 

दरम्यान, सासवड बार असोसिएशनने आज बैठक घेऊन विश्‍वस्त मंडळामध्ये सासवड न्यायालयातील वकिलांना वगळून पुण्यातील वकिलांना घेतल्याचा निषेध केला. देवस्थानच्या घटनेमध्ये सासवड बार असोसिएशनचा एक वकील घ्यावा असे नमूद केले असल्याने 34 वकिलांनी मुलाखती दिल्या होत्या; मात्र एकालाही संधी न मिळाल्याने कायदेशीर मार्गातून न्याय मागणार असल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. महेश जाधव यांनी दिली. पुण्यातील चार विश्‍वस्त घेण्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवारी जेजुरी येथे शिवसेना, भाजप, जेजुरी ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने ‘जेजुरी बंद’ पुकारण्यात आला आहे,  असे फलक गावात लावण्यात आले आहेत. आज राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्याकडेही तक्रारी अर्ज  ग्रामस्थांच्या वतीने दाखल करण्यात आला असल्याचे समजते.