Sun, May 19, 2019 14:34
    ब्रेकिंग    होमपेज › Pune › जेजुरी गडाचा होणार कायापालट

जेजुरी गडाचा होणार कायापालट

Published On: Sep 04 2018 1:18AM | Last Updated: Sep 04 2018 1:18AMजेजुरी : वार्ताहर 

महाराष्ट्राचे कुलदैवत असणार्‍या खंडोबा देवाचे मंदिर आणि गड परिसराचे 1248 साली बांधकाम झाले. त्यांनतर राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी गडाच्या तटाचा जीर्णोद्धार केला. त्यानंतर सुमारे अडीचशे वर्षे गडाची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती झाली नाही. जेजुरी गडाचे जतन व्हावे, लाखो खंडोबा भाविकांना सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुमारे दीडशे ते दोनशे कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार केला जाणार आहे. दोन महिन्यांत आराखडा तयार करून डिसेंबरमध्ये मान्यता घेऊन जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी जेजुरी येथे सांगितले.

महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचे मंदिर, तसेच जेजुरी गड, पायरीमार्ग, जेजुरी शहरात भाविकांना सोयी सुविधा निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जेजुरी गडाचा विकास आरखडा तयार करण्यासाठी; तसेच या कामांची पाहणी करण्यासाठी जलसंपदा मंत्री व पुरंदर तालुक्याचे आमदार विजय शिवतारे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी  अधिकारी एन. पी. मित्रगोत्री, प्रांताधिकारी संजय आसवले, तहसीलदार अतुल म्हेत्रे, पुरातत्त्व  विभागाचे विलास वहाणे, जिल्हा परिषद सदस्य दिलीप यादव, शालिनी पवार, पंचायत समितीचे सभापती अतुल म्हेत्रे, तसेच सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, पोलिस, वनविभाग, महसूल आदी विभागाच्या अधिकार्‍यांनी जेजुरी गडाला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली.

या वेळी जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्‍वस्त राजकुमार लोढा, विश्‍वस्त अशोक सकपाळ, प्रसाद शिंदे, शिवराज झगडे, संदीप जगताप, पंकज निकुडे, व्यवस्थापक दत्तात्रय दिवेकर, जेजुरी पालिकेच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, मुख्याधिकारी संजय केदार, सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने, पोलिस उपनिरीक्षक राजेश मालेगावे, नगरसेवक जयदीप बारभाई, माजी नगराध्यक्ष मनोहर भापकर आदी उपस्थित होते.

जेजुरी गडाची पाहणी झाल्यानंतर जयमल्हार भक्त निवासात बैठक झाली, या वेळी बोलताना राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, दि. 24 रोजी मुख्यमंत्र्यांच्या  मार्गदर्शनाखाली शिखर समितीची बैठक झाली, यात देहू-आळंदीच्या विकासकामांबाबत चर्चा झाली. 

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्‍या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचा व जेजुरी गडाचा विकास व्हावा यासाठी आरखडा करण्याबाबत आपण चर्चा केली .त्याला अनुसुरून आज सर्व विविध विभागाच्या अधिकार्‍यांसहित जेजुरी गडाची पाहणी केली. 

जेजुरीच्या मुख्य मंदिरात गर्दी वेळी भाविकांची हवा न मिळाल्याने होणारी घुसमट,यावर अद्यावत यंत्रणा बसविणे,जेजुरी गडावर मंदिरात ज्या ठिकाणी ग्रेनाईट आणि मार्बल बसवले आहे ते काढून दगडाचे काम करणे,मंदिराचे जतन करण्यासाठी मंदिर व गडाचे बळकटीकरण करणे,पायरी मार्गावरील ऐतिहासिक दीपमाला आणि कमानी यांचे बळकटीकरण करणे,गडा सभोवतालचा परिसर हा महसूल खात्याकडे असून त्याचे हस्तांतर देवसंस्थानकडे करून तेथे दर्शनरांग,अन्नछत्र व विविध सुविधा निर्माण करणे,गडाच्या पायथ्याशी असणार्‍या ऐतिहासिक होळकर व पेशवे तलावाची डागडुजी करणे,जेजुरी नगरीची ग्रामदैवत जानाई देवी मंदिराचे सुशोभिकरण करणे , गडावर जाण्यासाठी तसेच शहरातील रस्ते ,स्वच्छतागृहे, बस स्थानकावर भाविकांसाठी लॉकर रूम तयार करणे,खंडोबा देवाच्या पालखी सोहळ्यातील कर्‍हानदीवर जाणारा मार्ग,तसेच कर्‍हा नदीवर घाट बांधणे आदी कामांचा समावेश जेजुरी विकास आराखड्यात केला जाईल.असेही शिवतारे यांनी सांगितले.

देवस्थान,नगरपलिका,ग्रामस्थ ,पालखी सोहळ्याचे मानकरी,खांदेकरी ,भाविक यांना विश्‍वासात घेवूनच हा आराखडा तयार केला जाईल यासाठी सर्वांनी राजकारण,मतभेद बाजूला ठेवून सहकार्य करावे असे आवाहन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केले. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी जेजुरीचा खंडोबा हा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून जेजुरी गडाचे ऐतिहासिक महत्व आबाधित ठेवून वैज्ञानिक दृष्टीकोन वापरून आराखडा तयार केला जाईल ,एक अभ्यासगट तसेच समिती स्थापन करून ग्रामस्थांच्या सूचना घेतल्या जातील.जेजुरीचा विकास आराखडा तयार करून जेजुरीला पुन्हा ऐतिहासिक धार्मिक वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला जाईल ,यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रमुख विश्‍वस्त राजकुमार लोढा सूत्रसंचालन शिवराज झगडे तर आभार पंकज निकुडे यांनी मानले.