Tue, Apr 23, 2019 14:16होमपेज › Pune › जपानच्या हाइकू काव्यप्रकाराचा हिंदीत समावेश

जपानच्या हाइकू काव्यप्रकाराचा हिंदीत समावेश

Published On: Jul 16 2018 1:43AM | Last Updated: Jul 16 2018 1:26AMपुणे : प्रतिनिधी 

दहावीच्या हिंदी पुस्तकात जपानच्या हाइकु या प्रसिध्द काव्यप्रकाराचा समावेश करण्यात आला आहे. काव्य प्रकारातील हा अत्यंत छोटा प्रकार असून केवळ सतरा शब्दात कविता लिहिली जाते. कवी आपले अनुभव आणि घटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रेरीत करतात. या काव्यप्रकाराचा पहिल्यांदाच दहावीच्या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना कविता, संवादात्मक कथा, हास्य व्यंग निबंध, यात्रा वर्णन, गझल, एकांकिका, लघुकथा, वैचारिक निबंध, कव्वाली, पत्रलेखन, जाहीरातलेखन, मुलाखत तंत्र यांच्या माध्यमातून जीवन कसे जगायचे हे शिकवणार असून जिवनाशी सांगड घालणारे साहित्य विद्यार्थ्यांना शिकता येणार असल्याची माहिती हिंदी विषय समितीच्या विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अलका पोतदार यांनी दिली आहे.

डॉ.पोतदार म्हणाल्या, विद्यार्थ्यांना जीवन जगत असताना शेती, व्यवसाय, तंत्रज्ञान, सामाजिक जीवनाची ओळख व्हावी, यासाठी दहावीच्या  कुमारभारती, लोकभारती, लोकवाणी या हिंदी पुस्तकांच्या माध्यमातून मार्गदर्शनाचे धडे दिले जाणार आहेत. यासाठीच विद्यार्थ्यांच्या सामाजिक, नैतीक जाणिवा समृध्द करणार्‍या अनेक हिंदी साहित्यीकांच्या साहित्यप्रकारांचा पुस्तकांमध्ये समावेश करण्यात आला आहे. धडे आणि कवितांमधील महत्त्वाच्या कठीण शब्दांचे अर्थ  देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना पाठ तसेच कविता समजण्यास कोणतीही अडचण येत नाही.

दहावीमध्ये व्दितीय भाषा म्हणून अभ्यासले जाणार्‍या लोकभारतीचे मुखपृष्ठ वारलीचित्र शैलीने नटलेले आहे. उपेक्षितांचा अपेक्षित सन्मान करणारे हे मुखपृष्ठ अत्यंत बोलके आहे.स्त्री-पुरूष समानता दर्शवणारे, कलागुणांना प्रोत्साहन देणारे स्वानंदा बरोबरच सामाजिक भान समजावणारे,एकता आणि सहकारिता यांना प्राधान्य देणारे आहे. या पुस्तकात दोन भागांमध्ये एकूण 22 पाठ देण्यात आले आहेत. यात 10 कवितांचा समावेश आहे. त्यातही बरषहि जलद, महाकाव्य अंश, गिरिधर नागर,पद या मध्ययुगीन रचनांचा समावेश आहे. जयशंकर प्रसादांची भारत महिमा ही कवीता आहे. तर मुकुटधर पांडेय यांची समता कि ओर ही नवीन कविता आहे.

बालकवी बैरागींच्या हास्यव्यंग कवितांचा देखील समावेश करण्यात आला आहे. उपन्यासकार प्रेमचंद कथाकार म्हणून देखील विद्यार्थ्यांना माहित व्हावेत यासाठी त्यांची बुढी काकी ही वर्णनात्मक कथा देण्यात आली आहे. पुस्तकातील प्रत्येक पाठाची रचना ही सृजान्मकतेला वाव देणारी, अध्ययनाला प्रेरक आणि पूरक ठरणारी तर आहेच, शिवाय ज्ञानरचावादाच्या पायर्‍या पूर्ण करणारी आहे. या पुस्तकात शेवटच्या पानावर संपूर्ण व्याकरण घटक, रचना विभाग-उपयोजित लेखन यांचे मार्गदर्शन केले आहे. शिवाय मध्ययुगीन रचनांचा भावार्थ देखील दिला आहे. जो विद्यार्थ्यांना आणि अभ्यासकांना अतिशय उपयुक्त आहे.

लोकवाणी हे व्दितीय भाषा-संयुक्त म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. इंग्रजी, मराठी, उर्दू, गुजराती आदी भाषांबरोबर अभ्यासले जाणार आहे. तसेच कुमार भारती हे हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे. यामध्ये 24 पाठांचा समावेश करण्यात आला असून 14 धडे आणि 10 कवितांचा समावेश आहे. यातिन्ही पुस्तकांच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांना नामांकित लेखकांच्या साहित्यकृतींचा थोडा अंश अभ्यासता येईलच शिवाय आपल्या जीवनाशी भावविश्‍वाशी त्यांची सांगड घालता येणार असल्याचे देखील डॉ.पोतदार यांनी सांगितले.