Tue, Mar 19, 2019 15:52होमपेज › Pune › नीरव मोदीप्रकरणी जेटलींनी राजीनामा द्यावा : चव्हाण

नीरव मोदीप्रकरणी जेटलींनी राजीनामा द्यावा : चव्हाण

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 22 2018 12:34AMपुणे : प्रतिनिधी 

हिरे व्यापारी नीरव मोदीने पंजाब नॅशनल बँकेस 11 हजार 360 कोटींचा गंडा घालून, देशातून पळ काढला आहे. तो राजाश्रयाखाली देशातून पळून गेला आहे. नीरव मोदीचा आर्थिक घोटाळा उघड झाल्याबरोबर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्यावर स्पष्टीकरण करणे गरजेचे होते; मात्र चार दिवस जेटली बोललेच नाहीत. यामध्ये काहीतरी काळेबेरे आहे. त्यामुळे या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा कारभार स्वप्नरंजक स्वरूपाचा आहे. सरकारने फक्त घोषणा करण्यापेक्षा वास्तववादी आकडेवारी जाहीर करावी, अशी मागणीही चव्हाण यांनी केली. 

पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी येथील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेऊन, दोन्ही सरकारच्या कामकाजावर टीका केली. यावेळी माजी मंत्री व कॉँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, हर्षवर्धन पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. 

चव्हाण म्हणाले, गोरगरिबांच्या खिशातून पैसा काढून केंद्र सरकार मोदी, मल्ल्यांसारख्यांच्या घशात घालत आहे. नीरव मोदीही केंद्र सरकारच्या परंपरेनुसार परदेशात पळून गेला आहे. पंतप्रधान जाहीर कार्यक्रमात नीरव मोदी यांचे कौतुक करतात, केंद्रीय अर्थमंत्री या घोटाळ्यावर चार-चार दिवस बोलत नाहीत, याचा अर्थ या प्रकरणात मोठे मासे आहेत. नीरव मोदीला मदत करणार्‍या सगळ्यांवरच कारवाई करावी. नीरव मोदी याने महाराष्ट्रात गुन्हा केला आहे, त्याच्यावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे विधिमंडळात मुद्दा उपस्थित करणार असल्याचेही चव्हाण म्हणाले. 

दोन्ही सरकारचा कारभार स्वप्नरंजक  

पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांसह केंद्र आणि राज्य सरकारमधील सर्वच मंत्री स्वप्नरंजक घोषणा करीत आहेत. ते दुसरे काहीच करीत नाहीत. उद्घाटनांनंतर दोन दोन वर्षे प्रकल्प सुरू झालेले नाहीत. विविध स्मारकांचेही तसेच झाले आहे. सरकारने स्वप्नरंजक घोषणा करण्यापेक्षा आकडेवारी जाहीर करावी. ‘हायपर लूप’साठी 40 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. ही गुंतवणूक राज्य करणार आहे की, केंद्र याबाबत सरकारने खुलासा करणे गरजेचे आहे. ‘हायपर लूप’ हे अजून प्राथमिक स्वरूपातील तंत्रज्ञान आहे. हे स्वप्नरंजनच आहे. लोकांना रोजगार हवा आहे, स्वप्न नको, असेही चव्हाण म्हणाले. 

वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला पळविले 

मुंबई येथील आंतरराराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मोदींनी अहमदाबाद येथे पळविले. हे मुख्यमंत्री सांगत नाहीत. बुलेट ट्रेन अहमदाबाद येथील वित्तीय सेवा केंद्रापासून मुंबईला आणण्याचे नियोजन आहे. बुलेट ट्रेन आम्हाला हवी आहे, की गुजरातला हे कळत नाही. हे सर्व मुंबईचे देशातील आर्थिक महत्त्व कमी करण्यासाठी केले जात आहे. भविष्यात मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहील की नाही, याबद्दल शंका वाटते. ऑक्सपोर्ट इकॉनॉमिक संस्थेने मुंबई हे भारताचे आर्थिककेंद्र राहिले नसून, ते दिल्ली आणि गुडगावला गेले आहे, असे नुकतेच म्हटल्याचेही चव्हाणम्हणाले. 

एकबोटेंना अटक न होणे हे सरकारचे अपयश 

कोरेगाव भीमा येथे विजय स्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात समुदाय येतो, त्या समुदायावर हल्ला होण्याची शक्यता राज्य सरकारच्या गुप्तचर यंत्रणेला माहिती नसेल, आणि या घटनेस जबाबदार असणार्‍या मिलिंद एकबोटे आणि इतरांना जर अटक होत नसेल, तर हे राज्य सरकारचे अपयश आहे, असेही चव्हाण म्हणाले.

मेक इन महाराष्ट्राची माहिती जाहीर करा

सध्या देशासमोर कृषी क्षेत्रात आर्थिक संकट निर्माण झाले असताना, दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्र नावाखाली जागतिक गुंतवणूक परिषद घेतली. याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत 12 लाख कोटींचे  ‘एमओयू’ झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दोन वषार्र्ंपूर्वी मेक इन महाराष्ट्र कार्यक्रम असाच गाजावाजा करून घेण्यात आला. यात राज्यात 8 लाख कोटींची गुतवणुक आणि 30 लाख युवकांना रोजगार मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. कोणत्या कोणत्या जिल्ह्यात नव्या कंपन्या सुरू झाल्या. किती युवकांना रोजगार मिळाले, हे राज्य शासनाने जिल्हानिहाय जाहीर करावे. खरे तर मेकिंग महाराष्ट्र हा कार्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरला आहे, असा आरोपही त्यांनी केला.